विश्व संमेलन समारोप

( सौजन्य - इसकाळ न्यूज सर्व्हीस)
"महाराष्ट्र राज्य स्थापनेला पन्नास वर्षे होत असल्यानिमित्त राज्याबाहेरील सांस्कृतिक सोहाळे, माहिती केंद्रे यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल,'' अशी घोषणा महाराष्ट्राचे सांस्कृतिकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी केली.
पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष गंगाधर पानतावणे होते. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात महाराष्ट्र माहिती केंद्र सुरू करावे आणि आंबेजोगाई येथे मराठी विद्यापीठ स्थापन करावे, अशा मागण्या महामंडळाने ठरावाद्वारे मांडल्या. ""या ठरावांवर राज्य सरकार गांभीर्याने विचार करेल. अमेरिकेत मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे क्रमिक पुस्तके तातडीने पाठविण्यात येतील,'' असे आश्‍वासन पाटील यांनी या वेळी दिले.
इंडिया कम्युनिटी सेंटरमध्ये झालेल्या या सोहळ्यास स्वागताध्यक्ष संदीप देवकुळे, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
""या संमेलनाने इतिहास घडविला,'' असा गौरव करून मंत्री पाटील म्हणाले, ""साहित्य-संस्कृती जोपासण्याचा हा उपक्रम सातत्याने चालला पाहिजे. अधिकाधिक मराठी भाषकांना यामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे. इथे आल्यावर संमेलनाचे व्यापक रूप समजले. ते पाहता त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. संमेलने कुठे घ्यायची हा निर्णय महामंडळाचा आहे. आम्ही लागेल ती मदत जरूर करू.''
ते म्हणाले, ""या वर्षी महाराष्ट्र राज्य स्थापनेला ४९ वर्षे पूर्ण होत आहेत. पन्नासाव्या वर्षात पदार्पण करताना राज्याचे सांस्कृतिक धोरणही जाहीर व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही अमेरिकेसारख्या देशात येऊन आघाडीवर आहात, याचा मला महाराष्ट्राचा मंत्री म्हणून अभिमान आहे. सांस्कृतिक धोरणाच्या प्रक्रियेत तुम्हीही सहभागी व्हावे आणि तुमचे विचार-सूचना मांडाव्यात.'' संमेलनाच्या संयोजनाबद्दल श्री. पानतावणे यांनी मोकळेपणाने कौतुक केले. ते म्हणाले, ""हे संमेलन एक वाङ्‌मयीन कार्यशाळाच होती. संतवाङ्‌मय, मनोरंजन, माध्यमे, मराठी भाषा, दिवाळी अंकांवरील परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन यांचा दर्जा उच्च राहिला. त्यातून एक अभ्यासपूर्ण चर्चा पुढे आली. संमेलनावर प्रारंभीच्या काळात झालेली टीका विसरून जा आणि नव्या उज्ज्वल भविष्याकडे पाहा.''
संमेलनाला मदत करणाऱ्या मान्यवरांचा या वेळी सत्कार करण्यात आला. श्री. ठाले-पाटील आणि स्वागताध्यक्ष देवकुळे यांनी आभार मानले.
तत्पूर्वीच्या सत्रांमध्ये "मेड इन चायना' या माहितीपटाचा परिचय, दिवाळी अंकांवरील परिसंवाद आणि सिंधुताई सपकाळ व अविनाश धर्माधिकारी यांची व्याख्याने झाली. स्थानिक कलाकारांनी "सारेगम' हा संगीताचा कार्यक्रम सादर केला. संदीप खरे आणि सलिल कुलकर्णींच्या "शब्द-स्वरांच्या गाठी'ने संमेलनाचा समारोप झाला.

Hits: 386
X

Right Click

No right click