अध्यक्षीय भाषण

अमेरिकेत सॅन होजे येथे शनिवार १४ फेब्रुवारीपासून पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन सुरू झाले. तीन दिवसांच्या
या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा गोषवारा. (सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स)

आज जगभर दहशतवाद्यांनी हैदोस मांडला आहे. दहशतवाद्यांना जात नसते, धर्म नसतो असे म्हणतात, पण या विधानात तथ्य नाही, हे दहशतवाद्यांच्या 'आयडेन्टिटी'ने सिद्ध केले आहे. पहिल्या विश्व साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या आपण साऱ्या साहित्यप्रेमींनी दहशतवाद आणि दहशतवाद्यांचा निषेध करून या आणि शहीद झालेल्या दु:खी कुटुंबांच्या शोकात सहभागी होऊ या.
यावर्षी मराठीचे पहिले विश्व साहित्यसंमेलन अब्राहम लिंकन आणि बराक ओबामा यांच्या देशात, अमेरिकेत भरत आहे. ही घटना मराठी साहित्याच्या इतिहासात अपूर्व आणि उल्लेखनीय आहे. आपण या संमेलनाचे अध्यक्षपद मला दिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.
मराठी साहित्याला मोठा इतिहास आहे. मराठी साहित्यात अनेक परिवर्तनं आली. परिवर्तन हे एक मूल्य आहे. ते प्रथम समाजात निर्माण व्हावं लागतं आणि नंतर ते जीवनाच्या विविध क्षेत्रांत प्रवर्तित होतं. अज्ञान, लोकभ्रम आणि पूर्वग्रह यातून मुक्त झालेली मानवी बुद्धी सामाजिक संबंधांचे बुद्धिप्रमाण म्हणून सुसंवादी नियमन करण्याचे मार्ग शोधू लागते. अशा वेळी बुद्धी तत्त्वज्ञानात्मक चर्चेचा विषय तर होतेच. परंतु व्यवहाराचे नियमन करणारा घटक म्हणूनही त्यास प्रतिष्ठा प्राप्त होते. म्हणूनच समाजात गती असते आणि गतीरोधकेही असतात. यातील संघर्षातून परिवर्तनाचे स्वरूप आणि दिशा स्पष्ट होतात. नंतर हेच परिवर्तनाचे तत्त्वज्ञान मानले जाते.
काही प्रज्ञावंत पुष्कळदा लोकरुढी आणि लोकपंरपरांना कवटाळून बसतात. त्यातून त्यांना बाहेर येता येत नाही. अशावेळी स्वाभाविकच परिवर्तनाची प्रक्रिया क्षीण होत जाते. त्याचा परिणाम वाङ्मयनिर्मितीवर होतो. म्हणूनच प्रज्ञावंतांनी लोकमनात परिवर्तनाच्या जाणिवा निर्माण करायला हव्यात. समाजात बुद्धिरक्षण आणि बुद्धिस्खलन या क्रिया घडत असतात. अशा वेळी बौद्धिक नीतीमत्ता जोपासणे प्रज्ञावंतांचे कार्य असते. महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे असे कार्य होते. जुन्या मूल्यांचे चिकित्साकार्य असते. महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे असे कार्य होते. अनिष्ठ हे निपटून आणि इष्ट ते रुजविण्याचे त्यांचे प्रयास लोकोत्तर होते.

विसाव्या शतकात गांधीवाद, मार्क्सवाद, आंबेडकरवाद आणि रंजनवाद उफाळूनच आला. रंजनवाद थोपवला तो जीवनवाद आणि सामाजिक बांधीलकी मानणाऱ्या अनेक लेखकांच्या कथा-कादंबऱ्यांनी. मध्यमवर्गीय समाज आणि साहित्यातील बेगडीपणा आणि साचलेपणा लक्ष्य करून मुखवटे ओरबाडण्याचे कार्य नवसाहित्याने केले. प्रारंभी पश्चिमी वाटा शोधत गेलेली मराठी समीक्षा स्वत:ची नवी मुदा घेऊन आली.
स्वातंत्र्योत्तर काळात दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, ख्रिस्ती, जनवादी, आदिवासी हे साहित्यप्रवाह उदयाला आले. अस्तित्ववादी लेखनही होतेच. 'अनियतकालिकांची चळवळ'ही भराला होती. अनियतकालिकांनी भाषेचे आणि समीक्षेचेही काही नवे प्रयोग केले, पण त्यांचे स्वरूप निव्वळ वाङमयीन होते. अनियतकालिकांच्या चळवळीने बंडखोर आणि प्रयोगशील कविता मराठीला दिली. समीक्षेच्या क्षेत्रात त्यांनी नवे बियाणे रुजविले. १९२० नंतर मोठ्या प्रमाणावर मराठी स्त्रीचं कौटुंबिक दु:ख, तिचं जगणं, तिचे प्रश्न आस्थेने मांडले गेले. स्त्रीशिक्षण, नीती-अनिती, रुढीपरंपरा, अंधश्रद्धा, स्त्रीमनाची अगतिकता गांभीर्याने व्यक्त झाली. कथा-कादंबरीबरोबरच संशोधन, समीक्षा आणि वैचारिक लेखनातही लेखिकांनी संचार केला. काव्यक्षेत्र तर मोहरून आलं आहे. स्त्रीवादी भूमिका घेऊन लेखन झाले. १९८० नंतर स्त्रीकाव्य स्त्रीवादी जाणिवांनी व्याप्त आहे. मराठी, ख्रिस्ती साहित्यसंमेलनाची फार मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्योत्तरकालीन ख्रिस्ती साहित्यनिर्मात्यांचे साहित्य बहुआयामी आहे. जनवादी साहित्य या वाङ्मयप्रवाहानेही चांगली वाटचाल केलेली दिसते.
दलित साहित्याची चळवळ उभी राहिली आणि नंतर अदिवासी साहित्याचा हुंकाराही प्रगट झाला. १९७५ नंतर आदिवासी तरुणांनी आपली सामाजिक, सांस्कृतिक दु:खं, आशा-आकांक्षा, जगण्याची ऊर्मी कवितेतून मांडली. विद्रोहाचा सूरही प्रगट झाला. आदिवासी कवयित्रीसुद्धा मराठी साहित्यातात आशयगर्भ कविता घेऊन उभी आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात ज्या दोन वाङमयप्रवाहांनी मराठी साहित्याला नव्या जाणिवा, नवी दिशा दिली त्या दलित आणि ग्रामीण साहित्याचे योगदान अपूर्व आहे. ही एकप्रकारे सांस्कृतिक परिवर्तनाची नांदीच होती. आरंभी दलित साहित्याची व नंतर ग्रामीण साहित्याची चळवळ प्रभावीपणे उभी राहिली. स्वातंत्र्योत्तर काळात हे दोन्ही प्रवाह एक तत्त्वज्ञान घेऊन उभे राहिले. अलिकडल्या काळात ग्रामीण साहित्याची चळवळ आकाराला आली आणि ग्रामीण लेखकांना ग्रामीण जीवनासंबंधीचे नवे भान आले. ग्रामीण व्यवस्थेतील शोषणाची, राजकारणाची, संयुक्त कुटुंबात येऊ पाहणारे दुभंगलेपण, नवे नेतृत्व, यांची चित्रणेही ग्रामीण लेखकांनी केली. सावकारीचे पाश, साखर कारखान्यांमुळे निर्माण झालेली सरंजामशाही, ग्रामीण जीवनातील शोषण यांचा उत्कट वेध ग्रामीण लेखकांनी घेतला.
ग्रामीण कविता अल्प प्रमाणात लिहिली गेली असली तर ती ग्रामीण माणसांच्या दु:खाची जाणीव व्यक्त करणारी आहे. आजची ग्रामीण कविता केवळ ग्रामीण जीवनाचे ढोबळ वर्णन करीत नाही, तर ग्रामीण जीवनातील अंतविर्रोध, ग्रामीण माणसाचे शोषण व होरपळ, भोवतीचे विदूप वास्तव यांचा अन्वय आणि अन्यवयार्थसुद्धा लावते. दलित साहित्य निर्मिती ही स्वातंत्र्योत्तरकालीन महत्त्वाची सांस्कृतिक घटना आहे. ज्यांचे मनुष्यत्व नाकारले गेले होते, त्यांना शब्द सापडताच त्या शब्दांनी विदोहाचे रूप धारण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या मानवमुक्तीचा लढा आणि दलितांना दिलेली नवी 'आयडेन्टिटी' हा दलित साहित्याचा प्रेरणासोत आहे. अस्तित्व आणि अस्मिता यांचे भान आले ते यामुळेच.
गेल्या पन्नास वर्षांतील दलित साहित्यनिर्मितीकडे कटाक्ष टाकला तर कविता, कथा, कादंबरी, आत्मकथा आणि वैचारिक लेखन मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येईल. दलित कवितेने मराठी कवितेच्या कक्षा रुंदावल्या आहेत. दलित आत्मकथनांनी मराठी चरित्र वाङ्मयाला लेखनाची नवी सूत्रे, मांडणी आणि आशय प्रतिपादनासंबंधी विचार करण्यास प्रवृत्त केले आहे.
दलित नाटक आणि दलित रंगभूमी आज ओसरत चालली आहे. अजून दलित कादंबरीकार प्रादेशिक कादंबरीकडे वळलेला नाही. त्यामुळे ग्रामीण संस्कृतीतील दलितांची होरपळ, मानसिक संघर्ष, राजकारण, अंतर्गत जातीय तेढ, ताणतणाव चित्रित व्हायचे आहे. प्राचीन मराठी वाङ्मयाचे आणि आधुनिक मराठी वाङ्मयाचे इतिहासही उपलब्ध आहेत. आज हे इतिहास खूपसे अपुरे वाटतात.
महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमांभोवती तेलगू, कानडी, छत्तीसगडी असे अनेक समाज आहेत. प्रदेश आहेत. राजकीय आणि आथिर्क कारणांमुळे मराठी माणसे या वेगवेगळ्या प्रदेशात गेले आहेत. त्यांनी तेथे आपली मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकवून ठेवली आहे. त्यांचे कौटुंबिक वातावरण मराठी आहे. अशा मराठी भाषकांनी तेथील भाषाही आत्मसात केली आहे.. तेव्हा साहित्यप्रेमी मराठी भाषकांनी आपले साहित्य तेथील प्रादेशिकभाषेत नेले पाहिजे आणि त्या त्या प्रदेशातील श्रेष्ठ वाङ्मयीन कृती मराठीत आणल्या पाहिजेत. मराठी साहित्यकृतीची भारतातील भाषांत भाषांतरे होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी साहित्यसंस्था आणि प्रकाशक यांना सामोरे यावे लागेल.

Hits: 527
X

Right Click

No right click