७६. कर्हाड २००३ - सुभाष भेंडे
स्वातंत्र्यपूर्वकाळातील महाराष्ट्रातील थोर विचारवंतांची महान परंपरा स्वातंत्र्योत्तर काळात खंडित झाली. विचारवंत एकतर उदासीन राहिले किंवा शासनाच्या कृपाकटाक्षासाठी जीव टाकू लागले. समाजाला विचार देण्याचे, खटकणार्या गोष्टींवर स्पष्ट शब्दांत टीका करण्याचे आपले मूलभूत कर्तव्य विसरले. आज सर्व क्षेत्रांत मूल्यांचा र्हास होताना दिसत आहे. याचे महत्वाचे कारण बुद्धिजीवी वर्गाचा बधिरपणा हे आहे. चोहोबाजूंनी जातीयवाद बोकाळलेला असताना, धर्माच्या नावाखाली हिंसाचार वाढत असताना, सर्व थरांवर भ्रष्टाचार फोफावत असताना बुद्धिजीवी वर्गाने मौनव्रत धारण केले तर तो वर्ग आपल्या सामाजिक दायित्वापासून ढळला असा त्याचा अर्थ होईल. समाजमन अस्वस्थ असताना संवेदनशील विचारवंत उदासीन राहूच शकत नाही. सभोवताली वादळ घोंघावत असताना जागरूक साहित्यिक आपल्या कोषात स्वस्थपणे जगूच शकत नाही. `आभाळ फाटले आहे. मी एकटा ठिगळ कुठवर लावणार ?' अशी सोईस्कर आणि डरपोक भूमिका घेऊन विचारवंत उदासीन राहिले, तर कुणीच ठिगळे लावत नाहीत आणि आभाळ फाटलेलेच राहते. आपले स्वत्व प्राणपणाने जपणार्या, सत्तेपुढे मान न झुकवणार्या निस्पृह विचारवंतांच्या परखड शब्दांना कोणत्याही शस्त्राहून अधिक धार असते.
Hits: 364