६६. सातारा १९९३ - विद्याधर गोखले
मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी, शासनाच्या पाठ्यपुस्तकात नि अभ्यासक्रमांत परिवर्तन होण्याची जरूरी आहे. ह्यासाठी साहित्य महामंडळाने पुढाकार घेऊन, नामवंतत साहित्यिकांच्या सहकार्याने एक नमुनेदार व्यापक योजना तयार करून ती शासला विचारार्थ सादर करणे जरुरी आहे. आजच्या अभ्यासक्रमात व पाठ्यपुस्तकांत अभिजात साहित्याचे पुरेसे प्रतिबिंब पडलेले आढळत नाही. साहित्य क्षेत्राची स्वायत्तता, ग्रंथनिर्मिती, ग्रंथप्रसार, पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम इत्यादीबाबत काही भरीव घडवून आणण्याची जबाबदारी प्रामुख्याने आम्हा साहित्यिकांची नि साहित्यप्रेमी रसिकांची आहे. त्या सर्वांची अभेद्य एकजूट होणे ही आजच्या घडीची आद्य गरज आहे. आम्ही एकजुटीने आणि आग्रहाने महाराष्ट्र शासनाला तसेच केंद्रशासनाला सांगू इच्छितो की, “ साहित्य महामंडळाच्या झेंड्याखाली ह्या पहा सर्व साहित्य-संबंधित संस्था एकजुटीने उभ्या आहेत! त्या एकच मागणे मांडत आहेत आणि ते हे की राष्ट्राची शानच नव्हे तर जान असलेल्या साहित्याच्या वृद्धीसाठी आपण अर्थ-सहाय्याबाबत कर्णासमान उदार व्हा, पण सर्व साहित्यविषयक व्यवहाराची सूत्रे आमच्या हाती सोपविण्यासाठी ‘यथेच्छसि तथा कुरू’ म्हणणार्‍या श्रीकृष्णाची लोकशाही वृत्ती धारण करा.
Hits: 311