६२. अमरावती १९८९ - के. ज. पुरोहित

एखादी भाषा किती लोक बोलतात, त्यापेक्षा त्या भाषेत लोक काय बोलतात, काय लिहितात याकडे आपले लक्ष असावे. साहित्याकडे लेखकाने, वाचकाने गंभीरपणे पहावे. साहित्य केवळ गंभीरच असावे असे नाही. साहित्य हा विविध रसांचा संसार आहे; व तेच त्याचे रूप सर्वकाळ राहील. साहित्य हे संस्कृतीचे वाहन आहे अशी सर्वत्र श्रद्धा हवी. अर्थात त्यासाठी साहित्य हेही त्या दर्जाचेच हवे. साहित्य समजणे म्हणजे केवळ त्याची माहिती होणे नव्हे. स्वत:च्या प्रत्यक्ष अनुभूतीशिवाय  साहित्य, वाङ्मय समजले किंवा कळले असे होऊ शकत नाही. म्हणून साहित्य हे स्वानुभवाधिष्ठित असावे. या दृष्टीने पाहता आपल्या संस्कृतीच्या आविष्काराची भाषा म्हणून मराठी भाषेला अधिक महत्व आहे. यासाठीच मराठीच्या संवर्धनाची आवश्यकता आहे. वाङ्मयीन संस्कतीत संकुचित विचारांना व भेदांना स्थान असणार नाही. आपल्या लिखाणात तीव्रता, उत्कटता, जाण यावी यासाठी आपण लिहिण्याचे क्षेत्र अधिकाधिक लहान करतो ते इतके की शेवटी आपण आपल्यावरच लिहू लागतो. तसे करण्यातही काही दोष नाही. परंतु वैयक्तिकतेच्या या बिंदूत सामाजिक सिंधू दिसावा असा प्रयत्न असला पाहिजे.

Hits: 370
X

Right Click

No right click