४३. १९६१ ग्वाल्हेर - सौ. कुसुमावती देशपांडे
सौ. कुसुमावती देशपांडे - साहित्य संमेलनाच्या पहिल्याच महिला अध्यक्ष. अभिजात साहित्यकृतीमध्ये निर्मात्याचे मन जीवनातील सुसंगती व विसंगतीचा मागोवा घेत असते व त्यातच ते बुडून जाते, स्वत:ला पूर्णपणे विसरते असे यांना वाटते. असा साहित्यिक आपल्या साहित्यातून जणू इतरांना विश्वाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करीत असतो. इतकेच नव्हे तर या विश्वाच्या पलिकडेही घेऊन जाण्याचा त्याचा प्रयत्न असतो. तुकाराम महाराजांचे अभंगही अशाच प्रकारे आत्मविस्मृतीचा आदर्श आहेत. त्यात श्रद्धेची उत्कटता व व्यावहारिक जीवनाविषयी रोखठोक विवेक यांचा विलक्षण संगम आढळतो. भावनांच्या उत्कटतेने एक रससिद्ध विश्व त्या अभंगात दिसते. केशवसुतांची साहित्यसाधना सौ. कुसुमावती देशपांडे यांना अशाच प्रकारची वाटते. ज्ञानाच्या पलिकडील जे विलक्षण आहे त्याचे दर्शन घडावे अशी त्यांना आस लागलेली दिसते..
Hits: 832