२६. सोलापूर १९४१ - वि. स. खांडेकर
ललित वाङ्मयाचा उगम बुद्धीच्या चहुविध चमत्कारंपेक्षा भावनेच्या सखोल सहानभूतीत आहे. मराठी लेखकांनी स्वप्नाळू वृत्ती सोडून, संकुचित वृत्तीचे घरटे बाजूला टाकून, जीवनाला सामोरे गेले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. श्रेष्ठ वाङ्मय कोणते ? उत्कृष्ट वाङ्मय हा भावनाशील हृदयाचा उचंबळून आलेला उद्गार असतो. ह्या उद्गारात जगातले दु:ख आणि दैन्य पाहून असह्य वेदनेने तळमळणार्या आत्म्याचा आक्रोश हवा, जगातली ढोंगे व सोंगे पाहून हसणार्या मनाचा खळखळाट हवा, जगातले धैर्य आणि शौर्य पाहून उत्साहाने टाळ्या पिटणार्या हृदयाचा उत्कट आनंदही हवा. हा आक्रोश, हा खळखळाट, हा आनंद आजच्या आमच्या ललितकथेत कमी प्रमाणात आढळतो याचे कारण एकच आहे - आमच्या साहित्यिकांचे संकुचित व्यक्तित्व. सर्व समाजाला आपल्या सजीवतेने हेलावून सोडणार्या ललितकथेच्या निर्मात्यांनी आपल्या मनाची उंची आणि अनुभवांचा साठा नेहमी वढत राहतील अशी दक्षतेने काळजी घेतली पहिजे. या बाबतीत आजचा एकही कथाकार हरिभाऊंची बरोबरी करू शकत नाही. विकासशील व्यक्तित्वाशिवाय ललितालेखक द्रष्टा होऊ शकत नाही. या महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आजच्या सुंदर ललितकथात समाजाच्या विशाल आणि सखोल चित्रणापेक्षा आत्मवरित्र व कल्पनारम्यता यांचेच विलक्षण मिश्रण झालेले आढळते. लेखकाचे व्यक्तित्व जगातल्या विविध अनुभवांशी समरस होऊन, घोळून आणि पोळून निघाले म्हणजे सामान्य माणसाला न दिसणार्या गोष्टी त्याला दिसू लागतात. उज्वल भविष्याची भव्य चित्रे त्याच्या डोळ्यांपुढे नाचू लागतात. हा भव्यपणाचा गुण आजच्या ललितकथेत तर नाहीच, पण १९२० - १९३० च्या कालखंडात तिने संपादन केलेले कलासौंदर्यही ती टिकवू शकेल किंवा काय याविषयी रसिकांच्या मनात शंका उत्पन्न होऊ लागली आहे. केवळ कलाविलासाने कुठल्याही सहित्यकाला आत्मप्रगटनाचा अनिर्वचनीय आनंद मिळत नाही हे खरे..
Hits: 503