सुमनांजली

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक - २.आप्त Written by सौ. शुभांगी रानडे

सासुश्वशुर कधि न झाले
असती आपणासारखे
वडिलधा-या आम्ही शब्दा
जाहलो हे पारखे ---- १

मातपित्यासम ही दिधली
प्रीती आम्हा सकलास
लेकी म्हणूनी वागविले
कधी न हो सासुरवास ---- २

लेकरांच्या सुखासाठी
यातनाही भोगल्या
मुखावाटे परि न उमटे
शब्द कधिही आपुल्या ---- ३

चार पुत्रांपरिस असती
चार लेकी आपुल्या
फुले येती नेटकीशी
वेलीवरती सानुल्या ---- ४

छत्र आपले दिवस काही
आणखी जरि लाभते
नवीन नातू पणतू पणती
पाहण्या हे साधते ---- ५

रोपट्याच्या शाखा इवल्या
गेल्या आता दुरवरी
पाहण्या त्या उभयतांनी
यावे आपण झडकरी ---- ६

उठत बसता काम करता
स्मरण आपुले नित्य होते
अश्रु भरती नयनी माझ्या
मनही ऐसे भरुनी येते ---- ७

सुख मिळे जे आज आम्हा
खरी कृपा ही आपुली
स्मरण त्याचे ठेवुनीया
वाहते ही सुमनांजली ---- ८

Hits: 116
X

Right Click

No right click