विठ्ठल अमुचा म्हणा

Parent Category: मराठी पुस्तके Category: सय कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा . . .

वारीस याच्या वारकरी किती जाती ना गणना
गळाभेट ती होता कोणी सानथोर मानेना
भजन हरीचे करिता करिता पाणी ये नयना
तहानभूकही हरपूनि जाता देई विठू दर्शना
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा . . . १

प्रेम शिंपुनी मनापासुनी नामा करी वंदना
ग्रहण कराया नैवेद्यास्तव धाडी आमंत्रणा
नाम्याची ती तगमग कळकळ परमेशा बघवेना
क्षीरसागरा सोडुनी येई नाम्याच्या अंगणा
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा . . . २

सोडुनी सार्यास मोहबंधना आले तुझिया शरणा
भवसागर हा तरूनि जाण्या धरिते तुझिया चरणा
तनमन माझे तुला वाहिले येऊ दे तुज करूणा
भेटीवाचु्नि तुझ्या विठ्ठला मजला मुळी करमेना
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा . . . ३

नंदनंदना गोपीरमणा गोकुळवासी कान्हा
पुन्हापुन्हा हे कथिते तुजला दयाघना पावना
चातकापरि मन हे माझे आतुर तव दर्शना
चरणावरि तव ठेवुनि मस्तक करिते मी याचना
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा . . . ५

जागोजागी जगती याच्या दिसती पाऊलखुणा
हेवेदावे पुसूनि टाका करू नका वल्गना
केवळ पैसा येई न कामा सकला अपुले म्हणा
सान जरि मी सर्वांहुनि तरी विनती सर्वांना
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा . . . ६

Hits: 145
X

Right Click

No right click