सय - मनोगत

Parent Category: मराठी पुस्तके Category: सय कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे


प्रिय वाचकहो,

नमस्कार, एक नवा कवितासंग्रह घेऊन पुनः एकदा मी आपल्या भेटीला येत आहे.

काव्यदीप व सांगावा हे माझे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या हातून सय हा तिसरा काव्यसंग्रह लिहून होईल असे वाटले सुद्धा नव्हते. पण आज तो योग आला आहे खरे. यासाठी मला मनापासून आभार मानायचे आहेत ते त्या देवरायाचे. त्याने आपल्याला किती म्हणून द्यायचे ? आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत मावणार नाही एवढे भरभरुन सुख दिले आहे त्याने. त्यामुळे त्याचे गुणगान करणारे शब्द हे आपोआप कवितारुप घेऊन आले. तसे लग्नाच्या अगोदर
पुण्याच्या पेंडसे चाळीतील एका लहानशा खोलीत राहणाऱ्या मला स्वतःच्या मोठ्या घरात-बंगल्यात राहिल्यावर माणसांची सोबत तशी थोडी कमीच; पण निसर्गाची, झाडाझुडपांची, कुत्र्यामांजरांसारख्या प्राण्यांची व विविध प्रकारच्या पक्ष्यांची सोबत मात्र भरपूर मिळाली. त्यामुळेच ही सर्व मंडळी कवितारुप कधी झाली ते समजलेच नाही.

या कवितांची मला मोठी मौज वाटते. प्रत्येक कविता अगदी थाटामाटात येते. तिचा पेहेराव, दागदागिने, वेगवेगळ्या प्रकारचे असतात. प्रत्येकीचा नखरा काही औरच असतो. कधी रुमझुम रुमझुम पैंजणांचा नाजुकसा नाद करत, कधी हातातच्या बांगड्यांची किणकिण करत, कधी लहान बाळासारखी दुडुदुडु धावत, कधी ठुमकत ठुमकत, कधी मधुर चिवचिव करत, कधी भ्रमरासारखा गुंजारव करत, तर कधी कोकिळेसारखा मंजुळ कुहूरव करत गाण्याची चाल लडिवाळपणे
माझापाशी कधी लगट करते ते कळतच नाही. आणि मग शब्दांचे थवेच्या थवे कोठूनसे येतात व त्या गेय कवितेच्या गाडीत जागा पटकविण्यासाठी त्यांची एकच झुंबड उडते. त्यातून निवड करुन योग्य त्या शब्दांना जागा मिळवून देण्याचे छोटेसे काम माझ्याकडून केले जाते. बाकी सर्व आपोआप जुळून येत असावे असे मला वाटते. देवाजीची किमया दुसरे काय!

देवाचे आभार मानायचे दुसरे कारण म्हणजे त्याने संसारात सोबतीला दिलेला जोडीदार डॉ. सु. वि. रानडे हे होय. पुष्पासंगे मातीस वास लागे, थोडीफार अशीच अवस्था झाली आहे माझी. म्हणजे असे की अत्यंत हुषारी पण तितकीच नम्रता, सुस्वभावी, समाधानी वृत्ती असणारा सहचर लाभल्यावर त्याच्या अंगच्या सद्गुणांचे काही कण माझ्यात उतरायला थोडा वेळा लागला खरा. पण आनंद यातच की त्यामुळे आमच्यात कधीच साधा वादविवाद सुद्धा होत नाही. मग राग-लोभ तर दूरच! जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मला अनमोल मदत व योग्य ते मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या जीवनसाथीदारास माझे शतश: धन्यवाद! केवळ धन्यवाद मानून ऋणातून उतराई न होता सदैव त्यांच्या ऋणात राहण्यातच मला अधिक
आनंद आहे.

सोन्यासारखी सुंदर मुले ब नातवंडे माझ्या पदरात टाकणाऱ्या देवाचे आभार मानण्यासाठी तर माझ्याकडे शब्दच नाहीत. संसारातील सर्व कर्तव्ये यथासांग पार पाडल्यानंतर आता मन अत्यंत तृप्त, शांत, समाधानी झाले आहे. तसेच जीवनात भेटलेली सर्व आप्तेष्ट मंडळीही आदरणीय अशीच असल्याने जीवनाचा पेला आनंदाने, समाधानाने अन् काठोकाठ भरलेला आहे.

पुस्तक प्रकाशनाच्या बाबतीत ज्ञानदीपच्या सर्व सहकाऱ्यांची लक्षणीय मदत झाली. तसेच छपाईचे कामही फारच थोड्या कालावधीत पूर्ण करुन दिल्याबद्दल श्री सेल्स चे श्री. यशवंत पाटील यांचे आभार.

सौ, शुभांगी सु. रानडे

Hits: 98
X

Right Click

No right click