१३. नाशिकच्या कारावासात - १

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

१३. नाशिकच्या कारावासात - १

१९३२ सालच्या ऑगस्ट महिन्यात धुळे तुरुंगातील काही सत्याग्रही नाशिकच्या तुरुंगात पाठवण्यात आले. त्यात गुरुजींचाही समावेश होता. नाशिकचा तुरुंग हवापाण्याच्या दृष्टीने चांगला होता. शिवाव गुरुजींच्या प्रिय श्रीरामाच्या वास्तव्याने पुनित झालेली ही भूमी.

तुझ्या धूळिमाजी वाटे लोळणे सुखाचे ।
इथे पाय पावन फिरले राम-जानकीचे ॥

अशी गुरुजींची उत्कट श्रद्धा. भक्ती. त्यामुळे मनातून ते सुखावले होते. परंतु नाशिकच्या कैदखान्यात येऊन दाखल होताच, तेथील परिस्थिती पाहून त्यांना उद्वेगच आला. त्या रामभूमीतल्या बंदीशाळेत रोच नामक इंग्रज रावणाचे अन्यायी
अधिराज्य चालू होते.

नाशिकच्या तुरुंगात गेल्याबरोबर त्या सर्व सत्याग्रहींना तेथील शिपायांनी आणि वॉर्डर्सनी करड्या स्वरात धमकावले, “यह धुलिया की धरमशाला नहीं, नासिक सेंट्रल जेल है! यहाँ रोच साहब का हुकूम चलता है!” रोच तिथला डेप्युटी जेलर होता. भलताच कडक आणि निष्ठुर होता. तुरुंगातली शिस्त बिघडू नये म्हणून त्याने दहशतीचे तंत्र अवलंबिले होते. नाना तऱ्हेने जाचक नियम आणि बंधने त्याने सत्याग्रही कैद्यांवर लादलेली होती. हुकुमाशिवाय उठायचे नाही की बसायचे नाही.
हुकूम मिळाल्याशिवाय खायचे नाही, शेजारच्या कैद्यांशी बोलायचे नाही. चक्की पिसण्याचे काम तर फारच त्रासाचे केले होते. तेथील राजबंद्यांनी शिस्त म्हणून हे सर्व पाळले होते, सहन केले होते. पण रोचने जेव्हा आणखी एक अपमानकारक
फर्मान काढले तेव्हा मात्र राजबंद्यांतही खळबळ माजली. रोचचे नवे फर्मान असे होते की, सायंकाळी जेव्हा कैद्यांची मोजदाद होते, गिनती होते, त्या वेळी राजबंद्यांनी पायावर हात ठेवून मान गुडघ्यात घालून उकिडवे बसले पाहिजे. हा अपमानास्पद निर्बंध पाळण्याचे राजबंद्यांनी जेव्हा नाकारले, तेव्हा पोलीस आणि वॉर्ड्स त्यांच्या डोक्यावर, त्यांनी मान खाली घालावी म्हणून, थपडा व दंडा मारू लागले.

गुरुजींनी 'अशा, प्रकारे मान खाली घालणार नाही, असे तेजस्वी निर्भयपणे सांगितले. राष्ट्राची मान उंच करण्यासाठी आलेल्या राजबंद्यांवर असली सक्ती होता कामा नये,' असे ते म्हणाले. त्यांच्यावर दंड्याचे प्रहार पडले, पण गुरुजींची मान खाली झुकली नाही. गुरुजींच्या या तुरुंगातील सत्याग्रहाने इतर राजबंद्यांना बळ मिळाले. तेही या निर्बंधाचा प्रतिकार करायला सज्ज झाले.

गुरुजींमुळे हे घडले, हे लक्षात आल्यावर रोचने गुरुजींनाच छळायला सुरुवात केली. त्यांना सेपरेटमध्ये ठेवले. खटल्यावर बोलावले. त्यांच्यावर फितुरीचा आरोप ठेवला. अंगात गोणपाटाचे टोचरे कपडे -गंजीकपडा -- घालायला दिले. हातापायात
साखळदंडाच्या बेड्या-दंडा-बेडी ठोकली. जेलअंतर्गत, कैद्याला छळायच्या म्हणून ज्या ज्या शिक्षा असतात त्या त्या गुरुजींना भोगाव्या लागल्या. परंतु त्यांनी त्या मोठ्या धैर्याने आणि शौर्याने सहन केल्या. गुरुजींना फटके मारण्याचा दुष्ट
विचारही रोचने केला होता. परंतु असे फटके मारले तर सारे राजबंदी बिथरतील आणि जेलची काहीच शिस्त राहणार नाही, असे जेव्हा तेथील काँग्रेसच्या वरिष्ठ पुढाऱ्यांनी रोचला सांगितले, तेव्हा रोचने तो विचार सोडून दिला.

पण लवकरच या राक्षसी वृत्तीच्या रोचची शंभर पापे भरली. बाडोलीच्या एका युवकाला त्याने मरेमरेतो मारल्याची बातमी बाहेर पसरली. रोचवर खटला झाला आणि त्याला सजा झाली. त्यानंतर नाशिकच्या तुरुंगातील वातावरण बदलले. अधिकारी मऊ वागू लागले.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 128
X

Right Click

No right click