१०. सक्रिय राजनीती - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

१०. सक्रिय राजनीती - ३

धुळ्याच्या तुरुंगात गुरुजी दोन-अडीच महिने होते. नंतर त्यांना त्रिचनापल्लीच्या तुरुंगात हलविण्यात आले. धुळ्याच्या तुरुंगात असताना तेथील कामधाम आटोपल्यावर गुरुजी लिहीत असत.

स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई ।
सुखवू प्रितम भारत गाई ॥

हे प्रसिद्ध गीत त्यांनी तिथेच लिहिले.

“खरा सत्याग्रही” नावाचे नाटकही त्यांनी लिहिले होते. याशिवाय “अस्पृश्यता”, 'खरी ग्रामसुधारणा' इत्यादी विषयांवर त्यांनी निबंधही लिहिले होते.

त्रिचनापल्लीचा सेंट्रल जेल हा दक्षिण भारतातील एक फार मोठा तुरुंग. त्यावेळी ३००० कैदी तिथे होते. केरळ, तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक, बंगाल, महाराष्ट्र अशा विविध प्रांतातील सत्याग्रही तिथे होते. त्यामुळे निरनिराळ्या भाषा कानावर पडू लागल्या. या विविध भाषा संमेलनामुळे गुरुजींना भारतातील भिन्नतेमधील अभित्रतेचा जवळून परिचय होण्याची संधी लाभली. एका कन्नड मित्राकडून त्यांनी कानडीचे धडे गिरवायला सुरुवात केली. एका तमिळ मित्राने 'बेबी सरोजची' गोष्ट सांगितली. पुढे गोड गोष्टीत तीच गुरुजींनी लिहून काढली. व्हिक्टर ह्युगो या फ्रेंच कादंबरीकाराच्या 'ला मिझराबेल'वर आधारित 'दु:खी' नावाची गोष्ट त्यांनी इथेच लिहिली.

त्रिचनापल्लीच्या कारावासात गुरुजींच्या ठायीची आंतरभारतीची भावना अधिक परिपुष्ट झाली. चांगली रुजली. “तिरुवल्लुवर' या तमिळ पंडिताच्या 'कुरल' नामक ग्रंथाचा अनुवादही गुरुजींनी येथे केला. तमिळ वाड्मयात कुरलची प्रतिष्ठा तमिळ वेद म्हणून सर्वमान्य आहे!

त्या वास्तव्यात गुरुजींनी अश्याच कविता लिहिल्या, नाटके लिहिली, निबंधही लिहिले. त्याच वेळी आचार्य भागवतही तिथे होते. आचार्य भागवत यांच्यासारख्या विद्वान, रसिक, साहित्य समीक्षकाचा सहवास गुरुजींना फारच लाभदायक ठरला.
आचार्यांनीच पुढे गुरुजींच्या 'पत्री' नामक कवितासंग्रहाला सुंदर व दीर्घ प्रस्तावना लिहिली.

१९३० साली अखेरपर्यंत निरनिगळ्या स्वरूपात, निरनिराळ्या ठिकाणी कायदेभंगाची चळवळ सुरूच राहिली. हजारो सत्याग्रहींनी तुरुंग भरून गेले. परंतु गांधीजींना मुक्त करून सरकारने वाटाघाटी सुरू केल्या. ५ मार्च १९३१ पर्यंत
वाटाघाटी होऊन अखेरीस गांधी-आयर्विन करार झाला. या करारानुसार सरकारने सत्याग्रहींची सुटका केली. २३ मार्च १९३१ रोजी साने गुरुजींना त्रिचनापल्लीच्या तुरुंगातून मुक्त करण्यात आले.

त्या दिवशी रात्री लाहोरच्या तुरुंगात सरकारने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या क्रांतिकारकांना फाशी दिले होते. गांधीजींनी त्यांच्या सुटकेसाठी केलेली रदबदली सरकारने धुडकावून लावली होती. या वार्तेने गुरुजी अशांत, अस्वस्थ झाले आणि त्या मनं:स्थितीच ते अंमळनेरला आले.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 107
X

Right Click

No right click