७. छात्रानंद गुरुजी - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

असाच एक प्रसंग. गुरुजी वर्गात शिकवत होते. बाहेर पाऊस पडू लागला. गुरुजींनी हातातले पुस्तक बंद केले नि म्हणाले, “चला, पावसात भिजायला.” इतर शिक्षक म्हणाले, “अहो साने, पावसात मुले भिजतील तर आजारी पडतील.” गुरुजी म्हणाले, “प्रभूचे लक्षावधी हात आपल्याला कुरवाळायला येत आहेत, मग का बंद वर्गात शिकवत बसायचे?” पावसाच्या धारा म्हणजे प्रभूचे लक्षावधी हात! केवढी काव्यमय कल्पना! केवढी रसिकता!! गुरूजी असे जीवनस्पर्शी शिक्षक होते.
जो पावसात मुलांना भिजायला, उन्हात तापायला, थंडीत कुडकुडायला, मातीशी मस्ती करायला नि आभाळाशी दोस्ती करायला शिकवतो, तोच खरा शिक्षक नि तेच खरे शिक्षण.

अडलेल्या-नडलेल्यांना मदत करण्यासाठी ते सदैव पुढे येत असत. जवळचे देण्याचा अभ्यास त्यांनी लहानपणापासूनच केला होता. शाळेत काही विद्यार्थी अत्यंत गरीब असत. घरच्या दारिद्रयामुळे शिक्षण अर्ध्यावरच सोडण्याची पाळी काही जणांवर येई. वैद्य नावाचा असाच एक विद्यार्थी होता. गरीब पण हुशार त्याच्यावर अशी वेळ आली. बिचारा दु:खीकष्टी झाला. गुरुजींच्या कानावर हे गेले. त्यांना आपली विद्यार्थीदशा आठवली. विद्येसाठी सोसलेला. वनवास आठवला. ते उपासतापास, ती मानहानी, सारे चटकन डोळ्यांपुढून गेले. गुरुजी उठले आणि वैद्यकडे गेले. म्हणाले, “तुला वर्षभर मी फी देईन, पण शाळा सोडू नकोस.”

छात्रालयातील गोपाळ नावाचा गडी एकदा विषमज्वराने आजारी पडला. शाळेच्या गड्यांनाही तुच्छ न मानता आपल्या बरोबरीचे मानायला शिकविणारे गुरुजी! त्यांना गोपाळच्या आजारपणाची वार्ता कळताच ते जेवण कसेबसे संपवून उठले आणि गोपाळच्या खोपटात गेले. गोपाळला त्यांनी आपल्या खोलीत आणले. कॉटवर मऊ बिछाना अंथरून झोपवले. डॉ. म्हसकरांना बोलावून घेतले. डॉ. म्हसकर राष्ट्रीय वृत्तीचे सद्र्हदय गृहस्थ होते. गुरुजींचा आणि त्यांचा ऋणानुबंघ पुढे पुष्कळच वाढला. डॉ. म्हसकरांनी सांगितल्याप्रमाणे औषधोपचार, पथ्यपाणी वगैरे गुरुजींनी चटकन सुरू केले. त्यांच्या मदतीला छात्रालयातील मुलेही असायची. गोपाळची सेवा-शुश्रूषा गुरुजींच्या सांगण्यानुसार करायची. कुणी गोपाळसाठी फळे आणून द्यायचा, कुणी औषधे आणायचा. गुरुजी गोपाळचे मलमूत्र साफ करायचे, पाय चेपून द्यायचे. रात्र रात्र त्याच्याजवळ जागत बसायचे. श्री. टी. के. जोशी हे श्यामच्या रामचे बंधू. ते व श्री. दत्तोपंत केसरी हे शिक्षकही मदत करायचे. गोपाळला २१ दिवसांचा ताप भरला. सर्वांनी सर्व प्रकारची काळजी घेतली. पण यश आले नाही. एकविसाव्या दिवशी गोपाळ हे जग सोडून गेला! गुरुजींना, मुलांना अत्यंत वाईट बाटले.

शाळेतल्या उच्च पदवीधर शिक्षकांनी गोपाळला खांदा दिला. गुरुजींनी मडके घरले. गुरुजींनीच अग्नी दिला. म्हणाले, “गोपाळ माझा धाकटा भाऊच होता.” स्वत:च्या अशा आचरणातून गुरुजी विद्यार्थ्यांना समतेची शिकवण देत होते. श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भावना मनामधून पुसून टाकण्याचे प्रयत्न करीत होते. छात्रालयात जेवणखाण एका पंक्तीत होत असे. जातिघर्माचा भेदाभेद मुळीच पाळला जात नसे.

याच काळात गुरुजींनी काही अभिनव असे उपक्रमही सुरू केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, याचा त्यांना ध्यासच लागलेला होता. या ध्यासातूनच त्यांनी 'छात्रालय दैनिक' सुरू केले. वहीच्या आकाराची पाच ते सहा याने पाठपोट एवढा मजकूर गुरुजी पहाटे उठून लिहीत असत. त्या दैनिकात कितीतरी विविध विषयांवरचे लेख ते देत असत. धर्म, शिक्षण, इतिहास, संस्कृती, थोरांची चरित, काव्य, कथा, असे अनेक प्रकारचे साहित्य असे. ते दैनिक मुलांना जणू विश्वदर्शन घडवीत असे. 'खरा शिक्षक मुलांना भूतकाळाची कल्पना देऊन भविष्याच्या दरवाज्यापर्यंत आणून ठेवतो.” गुरुजी आपल्या लेखणीने हेच कार्य करीत होते.

यानंतर थोड्याच काळात गुरुजींनी 'विद्यार्थी' नावाचे छापील मासिकही काढले होते. त्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. खाऊचे पैसे साठवून काहींनी मासिकाची वर्गणी भरली. 'विद्यार्थ्यांची ज्ञानलालसा वाढवून तिची विविध प्रकारे
तृप्ती करणे' हाच 'विद्यार्थी' मासिकाचा उद्देश होता. गुरुजींनी आपल्या बहुप्रसव आणि बहुव्यासंगी लेखणीने विद्यार्थ्यांना या मासिकाद्वारे भरभरून दिले. आशुतोष मुखर्जी, ईथरचंद्र विद्यासागर, इतिहासाचार्य राजवाडे, शिशिरकुमार
घोष, रवींद्रनाथ टागोर, बेंजॅमीन फ्रँकलीन अशी काही चरित्रेही गुरुजींनी या काळात लिहून प्रसिद्ध केली. या थोरांच्या चरिञकार्यापासून प्रेरणा व स्फूर्ती घेऊन तरुणांनी कार्यशील बनावे असा त्यांचा या लेखनामागचा हेतू होता. एक राष्ट्रकार्य म्हणूनच त्यांनी हे सर्व लेखन केले होते. ते म्हणत असत, "I am not a Teacher, I am a Preacher" शिक्षकाच्या पेशाकडे पाहण्याची त्यांची अशी उदात्त, पवित्र दृष्टी होती.
शिक्षक आणि छात्रालयप्रमुख म्हणून गुरुजी विद्यार्थ्यांत रमून गेले होते. या कामात त्यांचा हर्ष, आनंद, सुख, समाधान सर्व काही होते. छात्रालयातील त्यांच्या समरसतेमुळे त्यांना त्यांचे सहकारी 'छात्रानंद गुरुजी' असेच म्हणत असत.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>---------------------------------

Hits: 90
X

Right Click

No right click