९. स्वातंत्र्यलढ्यात उडी

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

९, स्वातंत्र्यलढ्यात उडी

साने गुरुजी छात्रालयाच्या कामात खूप रंगून गेले होते, त्यामुळे त्यांना सर्वजण “छात्रानंद' असेच म्हणत असत. गुरुजी आपल्या विद्यर्थिविश्वाशी एवढे एकरूप झाले होते! जे हाती घेतले त्यात प्राण ओतायचा व ते तडीस न्यायचे हा त्यांचा
स्वभावच होता. गुरुजी खरं तर सेवामूर्तीच होते! पण आपल्या हातून काहीच घंडत नाही याची खंत मात्र त्यांना सदैव वाटत असे. त्यांच्या अंत:करणात अशी एक रुखरूख होती, 'आपल्या हातून काही घडत नाही. देशासाठी आपला देह कारणी
लागत नाही, देशसेवा करण्याची संधी मिळत नाही.' याची त्यांना तळमळ लागून राहिली होती. त्यांना वाटायचे, आपण इथे या शाळेच्या कामातच बुडून जाणार का? बाहेर स्वातंत्र्याचा लढा चाललेला आहे, त्यात आपण नाही का उडी घेणार?
आणि अशा अस्वस्थ मन:स्थितीत असतानाच १९३० साल उजाडले. ३१ डिसेंबर १९२९ च्या मध्यरात्री लाहोर येथे काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 'संपूर्ण स्वातंत्र्य मिळवणे हेच आपले ध्येय आहे' असे घोषित केले. देशात नवचैतन्य उसळले! संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा गुरुजींच्या वाचनात आली आणि ते हर्षभरित बनले.

छात्रालयातील आपल्या खोलीत अतिशय आनंदाने मुलांबरोबर अक्षरश: नाचले. त्याच आनंदाच्या उर्मीत त्यांनी 'स्वातंत्र्याचे गाणे'ही- रचून म्हटले -

मंगल मंगल त्रिवार मंगल
पावन दिन हा धन्य अहो ।

भारत प्यारा स्वतंत्र झाला ।
जय बोला - जय बोला हो ॥

मेवाडाच्या रणशार्दूला ।
उठा उठा शिवराया हो ॥

माता आपुली स्वतंत्र झाली ।
जय बोला - जय बोला हो ॥

दिशा आज का प्रसन्न दिसती।
निर्मळ दिसती सांगा हो ॥

' भारत झाला स्वतंत्र म्हणुनी ।
जय बोला - जय बोला हो ॥

पवन आजचा पावन वाटे ।
कारण मजला सांगा हो ॥

भारतमाता मुक्त म्हणोनी
जय बोला - जय बोला हो ॥

पर्णांची फुले जाहली ।
का ते मजसी सांगा हो ॥

गतबंधन भू झाली म्हणुनी ।
जय बोला - जय बोला हो ॥

मातीची ही माणिकमोवी ।
झाली का मज सांगा हो ॥

भारत झाला स्वतंत्र म्हणुनी ।
जय बोला - जय बोला हो ॥

अशा तऱ्हेचा उत्तुंग कल्पनाविलास गुरुजींनी आपल्या कवितेत खेळवला असून मुक्त जयजयकारातच ही कविता संपते.

ह्या उद्धृत काव्यपंक्तीवरूनदेखील गुरुजींच्या चित्तवृत्ती कशा मोहरून आल्या होत्या हे दिसते. त्याच वेळी २६ जानेवारी हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून सर्व देशभर साजरा करावा व स्वातंत्र्याची प्रतिज्ञा हिंदी जनतेने घ्यावी असा ठराव काँग्रेस
अधिवेशनात करण्यात आला होता. तेव्हापासून ते १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र होईपर्यंत प्रतिवर्षी २६ जानेवारीलाच 'स्वातंत्र्यदिन' सभा-मिरवणुकी-प्रतिज्ञावाचन अशा कार्यक्रमांनी देशभर साजरा केला जात असे. त्यानंतर स्वतंत्र
भारताची घटना सिद्ध झाल्यावर २६ जानेवारी १९५० पासून हा दिवस प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.

१९३० सालच्या २६ जानेवारीला गुरुजींनी छात्रालयाचा परिसर सडारांगोळ्यांनी सुशोभित केला. झेंडावंदन झाले. स्वातंत्र्याची गीते म्हटली. गुरुजींनी या निमिताने -

अजि घुमघुमली स्वतंत्रतेची भेरी
दुमदुमली दुनिया सारी
अजि राष्ट्राने स्वतंत्रतेची केली
घोषणा धीर या काळी.

असे एक गीत लिहिले होते. “प्राण अर्पावे स्वातंत्र्यसौख्य मिळवावे. अशी स्वातंत्र्याची महती गाणारी आणि प्रकट करणारी आणखी पुष्कळ गाणी गुरुजींनी लिहिली होती. ध्यानी-मनी-स्वप्नी त्यांना जणू स्वातंत्र्याचा ध्यासच लागलेला होता.
त्यांच्या ध्यासाचा संस्कार विद्यार्थ्यांवरही आपोआपच होत असे. त्यांच्यातही स्वातंत्र्यप्रेम उदित होत असे.

दुसर्‍या दिवशीच्या छात्रालय दैनिकात गुरुजींचा लेख झळकला. त्यांनी लिहिले होते, “कालचा दिवस मोठ्या भाग्याचा! मोठ्या सोहळ्याचा!! मोठ्या कौतुकाचा!!! मोठ्या आनंदाचा!!!! ज्यांनी आयुष्यात हा दिवस पाहिला ते लोक धन्य होत.
१८५७ नंतर एवढा भाग्याचा दिवस उगवला! कालची प्रभातवेळा मंगल होती. काल शिवनेरीस जन्म पावलेला, स्वातंत्र्यमंदिर उभारणारा, स्वातंत्यदेवीचा लाडका बाळ शिवाजी याला परमानंद झाला असेल व त्या प्रिय महाराष्ट्र भूमीवर, त्या हिंदी
भूमीवर आनंदाश्रूमोचन त्यांनी केले असेल.

"परंतु कालचा दिवस हा आरंभ आहे, कालच्या दिवसापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जोराने खटपट सुरू करायची आहे. काल स्वातंत्र्याचे जाहीरनामे सभांमधून ऐकले असाल, पण सर्वात मोठी गोष्ट स्वत:च्या मनाला ते वाचून दाखवणे ही होय. आपले मन धडधडून साफ केले पाहिजे. स्वतंत्र केले पाहिजे. आपण तेव्हाच स्वतंत्र होऊ जेव्हा आपली मने आधी स्वतंत्र होतील!”

स्वातंत्र्यासाठी गांधीजी आणि इंग्रज व्हॉइसरोय यांच्यात पत्रव्यवहार सुरू होता. गांधीजींनी हिंदी जनतेसाठी ११ मागण्या व्हॉइसरॉयकडे केल्या होत्या, पण त्याला साफ नकार मिळालेला होता. गांधीजी म्हणाले, “मी भाकरी मागितली, परंतु दगड
मिळाले.”

आता लढा अटळ ठरला होता. गांधीजींनी या वेळी लढ्याचा अभिनव असा मार्ग काढला. त्यांनी ज्या अकरा मागण्या मागितल्या होत्या, त्यात 'मिठावरला कर रद्द करावा' अशी एक मागणी केलेली होती. गांधीजींनी ह्याच मागणीवर सत्याग्रह करण्याचा निर्णय केला.

सत्याग्रहाची सर्व देशभर तयारी सुरू झाली. देशात पुनः उत्साहाची लाट पसरली. मिठाचा कायदा मोडून मीठ बनवायचे! लुटायचे! ही लहानशी वस्तू मीठ! पण गांधीजींनी त्याला स्वातंत्र्याच्या महान प्रतीकाचा आशय दिला. ठिकठिकाणी
समुद्रकिनारी मिठाचा कायदेभंग होणार असे सरकारला गांधीजींनी कळवले. स्वत: गांधीजी गुजरतमधील दांडी या गावी जाऊन कायदेभंग करणार होते. गुरुजींना या लढ्यात भाग घ्यावा, अशी तळमळ लागून राहिली होती. पण
शाळा-छात्रालयाचे काम हाती होते. गुरुजींनी मनावर ताबा ठेवून ते दिवस कसेबसे लोटले आणि मग २९ एप्रिल १९३० रोजी गुरुजींनी शाळेचा निरोप घेतला. गुरुजी स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 123
X

Right Click

No right click