२. जडणघडण -२
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------
२. जडणघडण -२
लहानग्या श्यामने एकदा गुलबाक्षीच्या कळ्या तोडून आणल्या. आई म्हणाली, “श्याम, मुक्या कळ्या नको हो तोडू! त्यांना नीट फुलू दे.” कळ्या फुलल्या नाहीत. त्या तशाच सुकून गेल्या. अर्धवट कामे नीट फुलत नाहीत हा बोध श्यामने घेतला.
एकदा श्यामला आईने आंघोळ घातली, अंग पुसले. श्यामने हट्ट धरला, “तळवे पूस. त्याला माती लागेल.” आईने ओच्याने तळवे पुसले. तिने आपल्या अंगावरचे लुगडे ओले करून घेतले. मुलासाठी आई काय करणार नाही? ती म्हणाली, “श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस. तसे मनाला घाण लागू नये म्हणून जप हो!”
आईने साध्या सरळ गोष्टीतून एक थोर शिकवण दिली होती!
आईने एकदा सावित्रीचे व्रत घेतले होते. वडाला ३ दिवस १०८ प्रदक्षिणा घालायच्या होत्या. पण आई आजारी होती. ताप भरला होता. तिच्याने प्रदक्षिणा होणार नव्हत्या. ती म्हणाली, “श्याम, उद्या मी वडाची पूजा करीन. तीन प्रदक्षिणा घालीन. बाकीच्या तू पुऱ्या कर हो बाळ.”
“पण माझ्या प्रदक्षिणा कशा चालतील?”
“हो बाळ! देवाला डोळे आहेत. मी आजारी आहे हे त्याला माहिती आहे.”
“पण बायका मला हसतील. मुलं चिडवतील. मला लाज वाटते.” श्याम कुरकुरत म्हणाला. आई खिन्न झाली. ती म्हणाली, “आईचे काम करायला कसली रे लाज? हे देवाचे काम आहे. ते करण्यासाठी कुणी हसले तर तेच वेडे ठरतील. देवाचे काम करायला कोणी लाजू नये. पाप करायला माणसाने लाजावे!”
म्हातारी म्हारीण एक दिवस डोक्यावर लाकडाची पोळी घेऊन चालली होती. चालताना मोळी खाली पडली. जड मोळी कुणीतरी हात लावल्याशिवाय डोईवर कशी घेता येणार? पण हात तरी कोण लावणार? म्हातारीला शिवले तर विटाळ नाही का होणार? आईच्या अंत:करणात म्हातारीविषयी कळवळा दाटून आला. ती श्यामला म्हणाली, “श्याम त्या म्हातारीच्या डोक्यावर तेवढी मोळी दे!”
श्यामच्या बालमनावर दु:खित-दलितांबद्दल अपार सहानुभूती बाळगावी, अशी थोर शिकवण कोरली गेली. समाजाची कामे करणारी सारी माणसे देवाला प्रिय असतात. कुणी हीनदीन नसतो, कुणी श्रेष्ठ-उच्च नसतो. सगळे सारखेच समान असतात याचे भान श्यामला आले.
श्यामला धीट बनवण्यासाठीही आईने प्रयत्न केले. तो भित्रा राहू नये म्हणून प्रसंगी ती कठोरदेखील बनली.
कोकणमध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. अशा वेळी पोहण्याची मौज असते. नवीन मुलांना या वेळेसच पोहायला शिकवतात. नवशिक्याच्या कमरेला सुकड किंवा भोपळा बांधून विहिरीत सोडतात. श्याम ही गंमत काठावरून पहायचा. त्याला पाण्याची भीती वाटायची. आई पुष्कळ वेळा म्हणायची, “श्याम, अरे पोहायला शीक. लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती? उद्या रविवार आहे, पोहायला जा.”
श्याम काही बोलला नाही. रविवार उजाडला तसा तो माळ्यावर कुठेतरी दडी मारून बसला. मुले बोलवायला आली. त्यांनी त्याला शोधून काढले. पण श्याम हालेचना. आईला राग आला. पाठीवर शिपट्या मारीत तिने त्याला फरफटत नेले.
कंबरेला सुकड बांधले. पाण्यात ढकलले. श्याम घाबरला. ओरडू लागला. पण मित्रांनी त्याला धीर दिला. पोहताना हात कसे मारायचे ते सांगितले. हळूहळू श्याम धीट झाला. शेवटी त्याने सुकड न बांधता आपणहून विहिरीत उडी टाकली. श्यामने
व त्याच्या मित्रांनी ही गोष्ट त्याच्या आईला सांगितली. आईने दह्याची कोंढी त्याला खायला दिली. श्यामला दही फार आवडे. मग आईने तेलाची वाटी आणली. श्यामच्या पाठीवर मारलेल्या शिपटीचे वळ होतेच. त्यावर तेल लावीत रडवेली
होऊन म्हणाली, “श्याम, अरे तू भित्रा आहेस असे का जगाने तुला म्हणावे? तुला कुणी नावे ठेवू नयेत, तू धीट व्हावास म्हणून मी मारले. रागावू नकोस. चांगला धीट हो. निर्भय हो!”
तुळशीच्या अंगणात बेहड्याचे झाड होते. एकदा श्याम तिथेच खेळत होता. तेवढ्यात झाडावरून एक चिमणीचे पिल्लू टपकन खाली पडले. इवलेसे पिल्लू उंचावरून पडले. पार लोळागोळा होऊन गेले. श्यामने पाहिले. पिल्लाचे सारे चिमुकले शरीर थरथरत होते. छाती घडघडत होती. श्यामला वाईट वाटले. त्याने एका फडक्यावर ठेवून त्या पिल्लाला घरात आणले. मऊ कापसावर ठेवले. श्याम आणि त्याचा भाऊ पिल्लाची काळजी घेऊ लागले. पिल्लाच्या चोचीत तांदळाच्या बारीक कण्या भरवू लागले. झारीने पाणी पाजू लागले. पण इवलेसे पिल्लू त्यात ते घायाळ झालेले! ते कसे खाणार-पिणार? त्याने अखेरीस मान टाकली. श्यामला फार फार दु:ख झाले. श्यामने आईच्या जुन्या जरीच्या चोळीच्या रेशमी तुकड्यात त्या पिल्लाचा देह गुंडाळला आणि शेवंतीच्या व मोगऱ्याच्या झाडाच्यामध्ये खड्डा खणून पुरून टाकला.
कितीतरी वेळ श्याम बाजूला रडत बसला. म्हणाला, “आई, मी त्या पाखराचे सुतक पाळणार आहे.” आईने समजूत काढली. म्हणाली, “ तू या पाखरावर प्रेम केले तसेच पुढे एकमेकांवर करा. नाहीतर पशुपक्षांवर कराल, परंतु आपल्याच भावाला पाण्यात पहाल. तसे नका हो करू! तुम्ही सारी भावंडे (एकमेकांना कधी विसरू नका!) तुमची एकच बहीण आहे. तिला अंतर देऊ नका. तिला भरपूर प्रेम धा.”
-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------
भूतदयेचा, प्रेमाचा पाठ श्याम शिकला.
Hits: 101