आचार्य विनोबा भावे
विनोबांचा जन्म
रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी ११ सप्टेंबर १८९५ रोजी विनायक भावे यांचा जन्म झाला. त्यांची आई त्यांना ‘विन्या’ म्हणत असे. त्यांनी आईसाठी ‘गीता’ मराठी भाषेत लिहिली. ‘गीताई’ म्हणून ती सर्वत्र प्रसिद्ध आहे. भारतीय संस्कृती व जीवनशैलीबद्दल त्यांचा विशेष अभ्यास होता. राष्ट्रभाषा हिंदी असावी व लिपी देवनागरी असावी, असा त्यांचा आग्रह होता. त्यांना १४ भारतीय भाषा येत होत्या. वेद आणि आश्रम अवस्थेवर त्यांचा विश्वास होता. अभ्यास होता. त्यांचा दृष्टिकोन वैश्विक होता.
गीताई हे विनोबा भावे यांनी भगवद्गीताचे मराठीत केलेले ओवीबद्ध भाषांतर होय. गीतेतील श्लोकांच्या अर्थाचा आशय न बदलता त्यातील श्लोकांचे भाषांतर किंवा समश्लोकी रचना विनोबा यांनी केली आहे. हे लेखन विनोबा भावे यांनी १९३२ साली केले. याच्या २०१७ सालापर्यंत २६८ आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत.[१] आपल्या आईला भगवत गीता समजावी म्हणून त्यांनी भगवद्गीतेचे भाषांतर मराठीत केले.
गीताई माउली माझी, तिचा मी बाळ नेणता |
पडता रडता घेई उचलुनी कडेवरी||
या शब्दात विनोबा यांनी गीताईचे महत्त्व वर्णन केले आहे.
भूदान चळवळ
विनोबांची स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाची कामगिरी म्हणजे भूदान चळवळ. देशातील जमीनदारांनी त्यांच्या जमिनीचा सहावा हिस्सा भूमिहीनांसाठी दान करावा, असे त्यांचे आवाहन होते. १९५१ साली काही लोकांनी तेलंगण भागात जमीनदाराविरुद्ध संघर्ष केला. तेव्हा जमिनीची योग्य वाटणी केली तरच खरी सामाजिक क्रांती होऊ शकेल, अशी भूमिका विनोबांनी घेतली. केवळ समाज प्रबोधनातून ७० दिवसांत त्यांना सुमारे १२ हजार एकर जमीन मिळाली.
'साम्ययोग', ‘मधुकर’
कुराणाच्या मराठी भाषांतरापासून त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. ‘साम्ययोग’ नावाचे मासिक ते पवनार आश्रमातून काढत होते. विनोबाच्या इतर ग्रंथात ऋग्वेदसार, ईशावास्य वृत्ती, वेदान्ससुधा, गुरुबोधसार, भागवतधर्म प्रसार यांचा समावेश आहे. त्यांचे ‘मधुकर’ नावाचे पुस्तक आबालवृद्धात परिचित आहे.