गीताई अध्याय पंधरावा
श्री भगवान् म्हणाले
खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला ।
ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥ १ ॥
वरी हि शाखा फुटल्या तयास ।
ही भोग-पाने गुण-पुष्ट जेथे ॥
खाल्ली हि मूळे निघती नवीन ।
दृढावली कर्म-बळे नृ-लोकी ॥ २ ॥
ह्याचे तसे रूप दिसे न येथे ।
भासे न शेंडा बुडखा न खांदा ॥
घेऊनि वैराग्य अभंग शस्त्र ।
तोडूनिया हा दृढ-मूल वृक्ष ॥३॥
घ्यावा पुढे शोध तया पदाचा |
जेथूनि मागे फिरणे नसे चि ॥
द्यावी बुडी त्या परमात्म-तत्त्वी ।
प्रवृत्ति जेथे स्फुरली अनादी ॥ ४ ॥
जो मान-मोहांस संग-दोष ।
जाळूनि निर्वासन आत्म-निष्ठ ॥
द्वंद्वे न घेती सुख-दुःख-मूळ ।
ते प्राज्ञ त्या नित्य पदीप्रविष्ट ॥ ५ ॥
न त्यास उजळी सूर्य कायसे अग्नि-चंद्र हे ।
जेथ गेला न परते माझे अंतिम धाम ते ॥६ ॥
माझा चि अंश संसारी झाला जीव सनातन ।
पंचेद्रिये मनोयुक्त प्रकृतीतूनि खेचितो ॥ ७ ॥
पुष्पादिकांतुनी वारा गंध खेचूनि घेतसे ।
तशी घेऊनि ही सर्व देह सोडी धरी प्रभन् ॥८॥
श्रोत्र जिहवा त्वचा चक्षु प्राण आणिक ते मन ।
ह्या सर्वास अधिष्ठूनि ते ते विषय सेवितो ॥ ९ ॥
सोडितो धरितो देह भोगितो गुण-युक्त हा ।
परी न पाहती मूढ ज्ञानी डोळस पाहती ॥ १० ॥
योगी यत्न-बळे ह्यास पाहती हृदयी स्थित ।
चित्त-हीन अशुद्धात्मे प्रयत्ने हि न पाहती ॥ ११ ॥
सूर्यात जळते तेज जे विश्व उजळीतसे ।
तसे चंद्रात अग्नीत जाण माझे चि तेज ते ॥ १२ ॥
आकर्षण-बळे भूते धरा-रूपे धरीतसे ।
वनस्पतीस मी सोम पोषितो भरिला रसे ॥ १३ ॥
मी वैश्वानर-रूपाने प्राणि-देहांत राहुनी ।
अन्ने ती पचवी चारी प्राणापानांस फुंकुनी ॥ १४ ॥
सर्वीतरे मी करितो निवास ।
देतो स्मृति ज्ञान विवेक सर्वा ॥
समग्र वेदांस हि मी चि वेद्य ।
वेद-ज्ञ मी वेद-रहस्य॥ १५ ॥
लोकी पुरूष ते दोन क्षर आणिक अक्षर ।
क्षर सर्वे चि ही भूते स्थिर अक्षर बोलिला ॥ १६ ॥
म्हणती परमात्मा तो तिजा पुरूष उत्तम ।
विश्व-पोषक विश्श्वात्मा जो विश्वेश्वर अव्यय ॥ १७ ॥
मी क्षरा-अक्षराहूनि वेगळा आणि उत्तम ।
वेद लोक म्हणे माते म्हणूनि पुरूषोत्तम ॥ १८ ॥
मोह सारूनि जो दूर जाणे मी पुरूषोत्तम ।
सर्व-ज्ञ तो सर्व-भावे सर्व-रूपी भजे मज ॥ १९ ॥
अत्यंत गूढ हे शास्त्र निर्मळा तुज बोलिलो ।
हे जाणे तो बुद्धिमंत होईल कृत-कृत्य चि ॥ २०॥
अध्याय पंधरावा संपूर्ण
Hits: 125