बावन्नकशी सुबोध रत्नाकर - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: सावित्रीबाई फुले - समग्र वाङ्मय Written by सौ. शुभांगी रानडे

।। जोतिबा।।

चिमा थोर माता पिता गोविंदाजी
तयाचे कुशी जन्मला जोतिबाजी
सती धन्य माता यती धन्य पीता
तया वंदिते आदरे जोतिकांता ॥३४॥

नऊ मास झाले चिमा माय मेली
चिमू जोतिची फार आबाळ झाली
परी त्याजला मानवी झोप घ्याया
मिळाली सगुणा महादेव-माया ॥३५॥

मिळे ज्ञान पाद्री निधर्मी विजाती
तिथे वाढला खेळला बाळ जोती
सगुणा दयासागरी ज्ञान वाढे
तसे काढतो, घोकतो अंक पाढे ॥३६॥

पुढे गावठी जोति शाळेत जाई
गुरूजीकडूनी धडे पाठ घेई
परी शिक्षणाला दुष्ट खीळ मारी ।
तया छेदुनी मुन्सिलीजीट तारी ॥३७॥

करी जोति शेती घडे लग्न त्याचे
घेई इंग्रजीचे धडे छान वाचे
मला आऊला पाठ देई शिकाया
असामान्यतेचा भरी भव्य पाया ॥३८॥

खरे ज्ञान संपूर्ण घेऊन जोती
मनी स्फूर्ती सूचीर सेवा सुचिती
मुलींना तशी शूद्र मुलास शाळा
मुळारंभ ऐसा गुंफीतो सुमाळा ॥३९॥

करी फार कौतुक पाद्री विधर्मी
परी त्रास देती शहाणे स्वधर्मी
मला निंदती शेण धोंडेही मारी
अशा संकटाला खुबीने निवारी ॥४०॥

स्वत:च्या विहीरी महारास वाटा
मनुष्यत्व दावी तयाचा सुवाटा
दलीतास आदेश स्वदोष साचे
न भूतो चमत्कार जोती युगाचे ॥४१॥

पथा चूकल्या कामिनी पोटुशीना
प्रसूतिगृही सोय मोलाचि नाना
सुईणी, दवा, पाणी खाणे, पिणेही
व्यवस्था अशी सर्व सावित्री पाही ॥४२॥

शिशु आश्रमी पाळणे हालविती
अशा दिव्य कार्यात तल्लीन जोती
एका रात्रि मारेकरी दोन आले
परी जोतिला पाहुनी लीन झाले ॥४३॥

तुकाराम जैसा तसा संत जोती |
सुधा ज्ञान देई जना रीतिभाती
पुढारी क्रियाशील द्रष्टा प्रसिद्धी
वदे जोति रूढी असे ती असिद्धि ॥४४॥

समस्तांस सोपा सत्यधर्म दावी
वदे उच्च वा नीच कोणी न भावी
किती पुस्तिका पुस्तकेही लिहोली
तशी काव्यसारंग गाणीहि केली ॥४५॥

म्हणे जोतिबा इंग्रजी गाय पान्हा
पिवूनी बळी हो अभिजात कान्हा
प्रयत्ने धडे शिक्षणाचे करी रे
संसारात शांती समाधान घेरे ॥४६॥

अनायास संबोधिती शूद्र सारे
मुगाली इरी काकेयी आर्य गोरे
अशा कल्पनाचा इतिहास कावा
सत्यासत्य संशोधुनी बोध घ्यावा ॥४७॥

॥ उपसंहार।।

पुराणे कथा दर्शने खूप वाची
असे इंडिया शूद्र व्याख्या तयाची
अहा जोत जोती जळे शूद्र कार्या
तयांचा प्रणेता वदे जोति भार्या ॥४८॥

निराधार दु:खी ख्रियांचा पुढारी
दुबळ्या अडाणी जनांचा-मदारी
कृती तैसा खरा ज्ञानयोगी
स्रिशूद्रा करीता इही दु:ख भोगी ॥४९॥

जरी जन्मला शूद्र माळी म्हणोनी
खरा म्हार तो त्यास माळी न मानी
चिरंजीव जोती मनु उच्च झाला
नमस्कार माझा अशा जोतिबाला ॥५०॥

मनी कल्पना छान गोष्टी रचावे
जना ग्राह्म होईल ऐसेच गावे
मनी इच्छुनी काव्य केले स्वभावे
तुम्ही गाऊनी त्यातले सत्य घ्यावे ॥५१॥

जरी यातले थोडके ज्ञान झाले
तरी या श्रमाचे खरे चीज झाले |
श मला काव्य माझे कसे सत्य सांगा ।
मनोहार का रम्य तुम्हीच सांगा ॥५२॥ .

॥ इति बावन्नकशी सुबोध रत्नाकर समाप्त ॥ |
मिती शुक्ल पक्ष १५ शके १८१३ रात्री २ वाजून
२० मिनिटानी ही पोथी लिहून पुरी केली असे॥

सही/-
सावित्री जोतिबा फुले. द. खु.

Hits: 138
X

Right Click

No right click