दख्खनची दौलत - २
७ एप्रिलला भारताचे उद्योगमंत्री शामाप्रसाद मुखर्जी यांनी भारत सरकारचे औद्योगिक धोरण जाहोर केले. ते समजताच शंकरभाऊंनी महाराष्ट्रातील १५० कारखानदारांना तातडीची निमंत्रणे पाठवून ९ एप्रिलला परिषद बोलावली आणि स्वागताचे भाषण करतानाच, '' आपण आपले कारखाने चालविण्याचा खटाटोप करीत आहोत; पण खाजगी प्रयत्नावर उद्योगधंदे करणारांना काही अवसर राहणार आहे, का? सरकार, कामगार आणि आर्थिक परिस्थिती यांचे प्रश्न एकएकट्याने सुटणारे नाहीत. आपण सर्वांनी काही विचार केला पाहिजे. देशामधील साधनसंपत्तीचा उपयोग देशबांधवांना होण्यासाठी आपल्याला उत्पादन करायचे असतेच. हे उत्पादन ज्या कामगारांच्या साहाय्याने आपण करतो त्यांनी अडेल वृत्ती न ठेवता उत्पादन चांगले, वेळेवर व नियमित केले पाहिजे आणि सरकारी नियमांनी उत्पादनाचा देशबांधवांना उपयोग व्हावा अशी काळजी घेतली पाहिजे. यासाठी सरकार, मालक व कामगार या तिघांनीही एकविचाराने काम करायला हवे.
हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे केवळ युनियन जॅक काढून तिरंगी झेंडा लावणे नव्हे. उद्योगदृष्ट्या आपण स्वाबलंबी व स्वयंपूर्ण व्हायला हवे. या देशात सुबत्ता होऊन लोक सुखी व्हायला पाहिजेत, यासाठी आपण पुढच्या अडचणीतून डोके वर काढून, संघटितपणे नवा हुरूप आणि विश्वास धरून, सर्वांनी कंबर बांधूया. सर्व कारखानदार अशा विश्वासाने प्रभावित होऊन कामास लागले पाहिजेत."
जानेवारी १९४५ मध्ये किर्लोस्कर मासिकाने २५ वर्षे पूर्ण केली शं. वा. कि. यांचे किर्लोस्कर मासिक जन्माला आले त्या काळी सामाजिक जीवनाप्रमाणे वाड्मयीन जीवनांतही बालमृत्यूचे प्रमाणे मोठे होते. ''किर्लोस्कर''च्या पूर्वीची ''मनोरंजन'', ''उद्यान'', ''नवयुग'', वगैरे मासिके त्याच्या आगेमागे सुरू झालेली ''अरविंद'', ''रत्नाकर'', ''यशवंत'', इत्यादी मासिके कुणी अल्पकाळ, तर कुणी अधिक काळ चमकून अस्तंगत झाली. अल्प आयुष्य हा कर्तबगार व्यक्तीप्रमाणे प्रभावी नियतकालिकाला मिळालेला फार मोठा शाप होऊ शकतो. आणि म्हणूनच ''किर्लोस्कर'' मासिकाने चाळीशी गाठली. इतकेच नव्हे तर ती त्याच्या प्रवर्तकाच्या जागरूक नेतृत्वाखालीच गाठली. ही मराठी नियतकालिकांच्या इतिहासांतली एक अत्यंत आनंदप्रद गोष्ट होती. तीन तपांपेक्षा अधिक काळ ''किर्लोस्करा''चा अंतरंग व बहिरंग या दोन्ही दृष्टींनी विकास होत गेला. याला कारण त्याच्यामागे उभे असलेले शंकरावांचे कल्पक, डोळस, बहुरंगी व कर्तृत्वशील व्यक्तिमत्व होय. सौम्य पण तत्त्वनिष्ठ, व्यवहारी परंतु ध्येयवादी,कलावंत असूनही यंत्रप्रेमी अशा तऱ्हेची त्यांच्या व्यक्तिमत्वाची घडण ''किर्लॉस्कर'' च्या विकासाला फार उपयोगी पडली.
१९२० नंतरच्या कालखंडातले, विविध क्षेत्रातले चांगले चांगले लेखक निवडून त्यांच्या साहाय्याने वाड्मयाच्या अभिवृद्धीला ''किर्लोस्करा''ने हातभार लावला. विविध आणि रंजक मजकूर अत्यंत आकर्षक रीतीने सादर करून ''किर्लोस्कर' ' ने वाचकवर्गाचे मर्यादित क्षेत्र विस्तृत करण्याच्या कामी मोठी कामगिरी बजावली आहे. किंबहुना १९२०-१९४७ या कालखंडात महाराष्ट्राला निरनिराळ्या क्षेत्रांत नवजीवनाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तीत ''किर्लोस्कर''चे स्थान वैशिष्टय़पूर्ण आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीला अनेक वर्षे होऊन गेली तरी सामाजिक सुधारणांच्या बाबतीत जडता व उदासीनता आजही जाणवत आहे. किंबहुना हा उदासीनतेचा काळोख दिवसेंदिवस अधिकाधिक दाट होत आहे. या पार्श्भूमीवर ''किर्लोस्कर'' मासिकाने सर्व प्रकारच्या वैचारिक जागृतीच्या बाबतीत सतत घेतलेला पुढाकार आणि बहुविध सामाजिक सुधारणांचा केलेला पुरस्कार डोळ्यांत भरतो. किंबहुना ''किर्लोस्करा''च्या रुपाने मराठी साहित्यातले पूर्वीच्या दोन पिढ्यांत परिपुष्ट होत आलेले तीन भिन्नभिन्न पण प्रभावी प्रवाह एकरूप झाले असे म्हणायला हरकत नाही. त्यातला पहिला प्रवाह 'निबंधमाला', 'विविध ज्ञानविस्तार', 'लोकशिक्षण' वगैरे गंभीर मासिकांच्या मार्गाने आला होता. ज्ञानप्रसार, लोकजागृति, समाजशिक्षण हे या मासिकांचे मुख्य कार्य होते. समाजाचा संपूर्ण कायापालट व्हायचा असेल तर त्याच्या राजकीय जीवनाइतकीच त्यांच्या सामाजिक, आर्थिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक स्थितीची, समस्यांची ब स्वणांची सतत मूलगामी चर्चा होत राहिली पाहिजे ही जाणीव 'किर्लोस्करा''ने पहिल्यापासून एखाद्या नंदादीपाप्रमाणे तेवत ठेवली. मात्र, केवळ मूठभर विद्वान किंवा पसाभर सुशिक्षित यांच्यापलीकडे या लेखांचे आवाहन जर गेले नाही, तर अरण्यांतून वाहणाऱ्या नदीसारखी या लेखनाची स्थिति होईल हे जाणून ''किर्लोस्करा''ने सर्व प्रकारच्या वैचारिक लिखाणाला आकर्षक साज चढविण्याचा कसोशीचा प्रयत्न केला.
Hits: 104