बुवा बाजीवर हल्ला - २
१९३३ अखेर किर्लोस्कर मासिकाने विक्रीचा बारा हजाराचा पल्ला गाठला होता. 'स्त्री'ने दहा हजारांची सीमा ओलांडली होती. मराठी नियतकालिकांच्या इतिहासात हा एक विक्रमच होता; पण प्रतिपक्षाने मासिकावर गदा आणण्याचा घाट घातला. कंपनीचे एक भागधारक ग. स. मराठे यांनी असा मुद्दा काढला की, 'कारखाना हा शेतीची औते करण्यासाठी काढला आहे. छापखाना काढणे, मासिके काढणे हे मूळ हेतूशी विसंगत म्हणून आक्षेप घेण्याजोगे आहे. ' त्यावेळी कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाचे चेअरमन रावबहादूर काळे हे प्रागतिक पक्षाचे नेते होते. भागीदारांच्या सभेत मराठ्यांची हरकत पुढे मांडल्यावर काळे यांनी आपला अभिप्राय पुढील शब्दांत मांडला. ''वास्तविक पाहता साहित्य हा औद्योगिक क्षेत्रापासून दूरचा विषय आहे असे वाटेल, तथापि आजकाल साहित्य, प्रकाशन हे लोकमत अनुकूल करून घेण्याचे व प्रसिद्धीचे बलाढ्य साधन आहे. एवढ्यांसाठीच युरोप अमेरिकेतील कारखानदार आपापल्या मालकीची नियतकालिकेही काढतात. तीच गोष्ट आपल्या मासिकांची आहे. गरीब, श्रीमंत, स्त्रिया, पुरुष, शहरवासी, ग्रामीण महाराष्ट्राचे-महाराष्ट्राबाहेरचे अशा सर्वांकडे ही मासिके जातात. त्यांनी फार मोठी लोकप्रियता मिळविली आहे. त्यामुळे कारखान्याच्या प्रसिद्धीचे काम होऊन, असंख्य व्यक्तींचा किर्लोस्करवाडीबरोबर स्नेह जोडण्याचा कार्यभाग ही मासिके पार पाडीत आहेत. तसेच महाराष्ट्रातील विद्वांनाचा, विचारवंतांचा संबंध जुळवून त्यांच्या सहानुभूतीचा लाभ ही मासिके आपल्या कंपनीस मिळवून देत आहेत. इतके करूनही ती आतबट्ट्यात चालली आहेत असेही नाही. सारांश, कोणत्याही दृष्टीने पाहता ही मासिके आपल्या कंपनीस उपयुक्त व फायदेशीर अशीच एक बाब आहे.''
''समाजाचे अंतिम कल्याण हे एकच ध्येय ठेवून मासिके चालवण्याचे आमचे धोरण आहे व त्याचा केव्हाही चुकीचा उपयोग केला जाणार नाही असे मीआपल्याला आश्वासन देतो. ''
रावबहाहूर काळे यांचे हे मतप्रदर्शन ऐकल्यावर संचालक सभेने मासिकांना मंजुरी दिली आणि मासिकातल्या लोकांचा हुरूप खूप वाढला. त्या काळात 'रत्नाकर', 'चित्रमयजगत्', 'प्रतिभा,' 'यशवंत' अशी अनेक मासिके निघत. चांगल्या गोष्टी, कविता, साहित्यचर्चा करणारी किंवा बहुविध माहिती देणारी अशी त्यामध्ये विभागणी होती.
'किर्लोस्कर' मासिकांच्या संपादकीय धोरणात करमणूक व माहिती या दोन्हीची सांगड घालूनही आधुनिकता आणि प्रगती यांच्या दिशेने जाण्याची प्रेरणा होती, त्यामुळे सुजाण वाचकवर्ग त्यांच्याकडे वेगाने आकृष्ट होत होता. सुशिक्षित तरुणवर्गास काही सांगावयाचे तर 'किर्लोस्कर' हे आवश्यक माध्यम ठरले होते. पण समाजात अशी काही माणसे असतात की, त्यांना समाजकारण, तात्विक विचार अशा गंभीर गोष्टीचा कंटाळा असतो. काहीतरी हलके-फुलके वाचायला हवे असते, ही गरज लक्षात घेऊन १९३४ च्या मार्च महिन्यात 'मनोहर' मासिक सुरू करण्यात आले. विनोदवृत्तीची जोपासना व करमणूक करणारे साहित्य देण्याचे धोरण 'मनोहरने' ठेवले होते. त्यामध्ये तरुणांना व कुमारांना लेख पाठविण्याचे आवाहन केले होते. त्याच अंकात 'संसार टॉकीज' ही क्रमश: येणारी कथामाला सुरू झाली. गोष्टी लिहिणारामध्ये फडके, खांडेकर, सावरकर, माधवराव बागल, भा. रा. भागवत, द. पां. खांबेटे, म. ना. अदवंत अशी जुनी-नवी दोऱ्ही पिढ्यांची नावे होती. कॉलेजमधल्या गमती जशा तरुणांना आवडल्या तसेच दा. वै. आठल्ये यांचा 'श्रीकृष्णाचा संदेश' ही गीतेतील प्रवृत्तिपर कर्मयोगाचे विवेचन करणारी लेखमालाही त्यांना आवडली. सप्टेंबर ३४ मध्ये वा. वि. शिरवाडकर यांचा ' भ्रष्ट झालेले धर्म' हा लेख आहे. रेडिओ ही त्याकाळात नवलाची गोष्ट होती. त्यासाठी 'मनोहरची आकाशवाणी' या शीर्षकाखाली ना. सी. फडके यांनी जेम्स हिल्टनची '"वुई आर नॉट अलोन'', अप्टन सिंक्लेअरची ''नो पॅसाँरा'', नुनी फ़रॅन्कची ''क्लोज्ड फ्रांटिअर्स'', व्हिकीबामची ''सिक्रेट सेंटेन्स'' अशा जागतिक कीर्तीच्या नवनव्या इंग्लिश कांदबऱ्यांचा परिचय मनोहरमधून रोडिओवर भाषण करण्याच्या शैलीने सादर केला.
Hits: 80