६. समाजवादी चळवळीची वाटचाल - १

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे

एस्‌. एम्‌. जोशी हे समाजवादी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते आणि आयुष्यभर समाजवादी चळवळीत त्यांनी समर्पण भावनेने काम केले. कॉलेजमध्ये शिकत असताना फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी आग्रहाने मांडल्या गेलेल्या स्वातंत्र्य-समता आणि बंधुत्व या तत्त्वांबाबतचे थोर विचारवंतांनी केलेले विवेचन वाचताना एस्‌. एम्‌. फार प्रभावित झाले. आयुष्यभर या तीन तत्त्वांच्या आधारे ते जगले.

स्वातंत्रय चळवळीत भाग घेताना त्यांच्या मनाला साफल्य लाभले. आपल्या देशातील आर्थिक आणि समाजिक विषमतेविरुद्ध आपण लढले पाहिजे, असे त्यांना स्वातंत्र्यलढ्यात काम करतानाही तीव्रतेने वाटे. स्वातंत्र्याला समतेची जोड नसेल तर ते केवळ राजकीय स्वातंत्र्य ठरेल, हा विचार मनोमन पटल्यामुळेच समाजवादी पक्षाच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. समाजवादी चळवळीत आचार्य नरेन्द्र देव, जयप्रकाश नारायण, डॉ. लोहिया, युसूफ मेहेरअल्ली, नानासाहेब गोरे यांच्या समवेत एस्‌. एम्‌. यांनी दीर्घकाळ वाटचाल केली.

यांच्यापैकी काही जणांशी त्यांचे मतभेद झाले. समाजवादी चळवळीत फाटाफूट झाली. परंतु या सहकाऱ्यांशी असलेला स्नेह मात्र अविचल आणि दृढ राहिला. आचार्य नरेन्द्र देव आणि एस्‌. एम्‌. यांच्यामध्ये वैचारिक मतभेदही कधी झाले नाहीत. आचार्य नरेन्द्र देव, एस्‌. एम्‌.ना धाकट्या भावाप्रमाणेच मानत असत. जयप्रकाशजींच्या बरोबर एस्‌. एम्‌. यांचे पूर्ण मनोमीलन झाले होते. जयप्रकाश नारायण यांनी समाजवादी पक्ष सोडून भूदान आंदोलनाला सर्वस्वी वाहून घेणे एस्‌. एम्‌. यांना मान्य नव्हते. परंतु जयप्रकाश नारायण आणि एस्‌. एम्‌. आयुष्यभर एकमेकाचे जिवलग मित्रच राहिले. युसूफ मेहेरअल्ली यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे समाजबादी चळवळीची मोठी हानी झाली. त्यांच्या मृत्यूनंतर एस्‌. एम्‌. म्हणाले, 'माझ्या जीवनाचा एक मोठा आधार नाहीसा झाला.'

डॉ. लोहियांचे प्रखर विचार

डॉ. राम मनोहर लोहिया हे समाजवादी चळवळीतील प्रतिभावान विचारवंत. एस्‌. एम्‌. यांना डॉ. लोहिया यांच्या वैचारिक झेपेबद्दल फार मोठा आदर होता. एस्‌. एम्‌. नेहमी म्हणत, डॉ. लोहियांनी मांडलेल्या विचारांमुळे भारतीय समाजवादी चळवळीला नवा आशय प्राप्त झाला. इतकेच नव्हे तर त्यांनी मांडलेल्या विचारांमुळे भारताच्या राजकीय जीवनातही एक मंथन झाले. १९५३ साली समाजवादी पक्षाच्या अधिवेशनात डॉ. राम मनोहर लोहिया यांनी सांगितले, भांडवलशाही आणि कम्युनिस्ट व्यवस्था हे दोन धुव मानले जातात, परंतु या दोन्ही समाज-रचनांनी मोठ्या यंत्राच्या साहाय्याने समाजांचे औद्योगिकीकरण केले आहे. भांडवलशाही श्रमिकांच्या आर्थिक शोषणावर आधारलेली आहे. हे शोषण नष्ट करण्यासाठी कम्युनिस्ट राजवटीने सर्व मूलभूत उद्योगघंद्यांचे राष्ट्रीयीकरण केले. परंतु या दोनही समाजरचनांमधील उत्पादन व्यवस्था मोठ्या यंत्रावरच आधारलेली आहे. अशा उत्पादन व्यवस्थेमुळे अर्थसत्तेचे आणि राजसत्तेचे केन्द्रीकरण होते आणि उत्पादक श्रमिक वर्ग हा कधीच बंधमुक्त होत नाही. आपण आपल्या देशाला अनुरूप अशा छोट्या यंत्राच्या आधारे आपली उत्पादन व्यवस्था विकेन्द्रित केली पाहिजे.

Hits: 91
X

Right Click

No right click