१. विद्यार्थिदशा आणि मनाची घडण - ५
वैचारिक परिवर्तन
एस्. एम्.ने त्या वेळची त्याची मन:स्थिती पुढील शब्दात वर्णन केली आहे : त्यावेळी माझ्या मनाची स्थिती तर अशी झाली होती की त्यामुळे सर्व घटनांमुळे पुढे स्थापन झालेल्या संघातच मी गेलो असतो. मुसलमानांबरोबर कसा काय व्यवहार करायचा, हा प्रश्न पडू लागला. मला चांगले स्मरते की मुसलमानांचे जे ताबूत निघत व त्यात सर्वजण जो भाग घेत तसा भाग आपण घ्यायचा नाही, असा माझ्या मनाशी मी निश्चय केला होता. परंतु याच वेळी ज्या राजकीय घटना घडत गेल्या त्यामुळे देशापुढील राजकीय प्रश्नाचे स्वरूप काय आहे, हे समजून येऊन एस्. एम्. हिंदुत्ववादी विचारांपासून दूर झाले आणि स्वातंत्रय चळवळीच्या मुख्य प्रवाहाकडे ओढले गेले. ८ नोव्हेंबर १९२७ ला भारताला राजकीय हक्क कोणते द्यावे, हे ठरविण्यासाठी सायमन कमिशनची नेमणूक केल्याचे व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी जाहीर केले. कमिशनवर एकही भारतीय नसल्यामुळे काँग्रेसने ठराव करून कमिशनवर बहिष्कार घालण्याचे ठरविले. याच वर्षी मुंबईत यूथ लीगची स्थापना झाली आणि यूथ लीगतर्फे पहिली यूथ कॉन्फरन्स वीर नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाली. ही कॉन्फरन्स घडवून आणण्यात मुंबईचे तरुण कार्यकर्ते युसुफ मेहेरअली आणि पुण्याचे आ. रा. भट यांनी पुढाकार घेतला. ते दोघेही कॉन्फरन्सचे कार्यवाह होते. यूथ लीगची स्थापना आणि सायमन कमिशनवर बहिष्कार घालण्याचा काँग्रेसचा निर्णय या दोन्ही घटनांचा एस्. एम्.च्या मनावर परिणाम झाला आपणही यूथ लीगमध्ये सामील व्हावे असा त्यांना आणि त्यांचे सहकारी ना. ग. गोरे आणि र. के खाडिलकर यांना वाटू लागले.
मुंबईच्या कॉन्फरन्सनंतर मेहेरअली पुण्यात आले. त्या वेळी या तिघांची मेहेरअलींबरोबर सविस्तर चर्चा झाली. ब्रिटिश साप्राज्यवाद्यांनी त्यांचे साम्राज्य कायम ठेवण्यासाठी भारतातील जनतेत सतत फूट पडली पाहिजे, असा राजकीय धोरणविषयक निर्णय घेतला आहे आणि "फोडा आणि झोडा" (Divide & Rule) ही दुष्ट राजनीती अवलंबिली आहे, हे मेहेरअली यांनी विस्ताराने सांगितले. विशेषत: हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये सतत तेढ राहावी, यासाठी ब्रिटिशांच्या ज्या कारवाया चालू होत्या तेही त्यांनी सांगितले. म्हणून स्वातंत्य चळवळीस गती येण्याकरिता ब्रिटिशांचा हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी हिंदू-मुसलमानांमध्ये आणि अन्य धर्मीयांच्या लोकांमध्येही ऐक्य घडवून आणणे जरूरीचे आहे, अशी भूमिका मेहेरअली यांनी मांडली. १८५७ च्या उठावाच्यावेळी बहादुरशहा आणि नानासाहेब पेशवे यांच्या एकत्र नेतृत्वाखाली लोक लढले हेही मेहेरअली यांनी सांगितले. एस्. एम्. गोरे आणि खाडिलकर यांना त्यांची भूमिका पटली. शिवाय हिंदुत्ववादी विचारांचे लोक स्वातंत्र्य चळवळीत भाग घेत नव्हते. या सर्व घटनांमुळे एस्. एम्, गोरे, खाडिलकर आणि चपलाबाई करंदीकर हे यूथ लीगचे सभासद झाले.
हिंदुत्ववादी विचारांबद्दल काही काळ आकर्षण वाटणाऱ्या एस्. एम्.च्या जीवनाला यूथ लीगमध्ये काम करण्यास सुरुवात केल्यावर आमूलाग्र वेगळे वळण लागले. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य समर्पण करावयाचे, असा निर्धार एस्. एम्., गोरे आणि खाडिलकर यांनी केला. ज्या यूथ लीगचे हे तीन तरुण सदस्य होते त्या यूथ लीगच्या पुढील तीन प्रतिज्ञा होत्या.
१) भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे म्हणून संघर्ष करणे
२) जातीयवादाशी सर्व त-हेने लढा देणे
३) सर्व वस्तू केवळ स्वदेशीच वापरणे.
एस्. एम्.ची वैचारिक भूमिका स्पष्ट होत असताना आणि भावी काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी हवा तो त्याग करण्याचा त्याच्या मनाचा निश्चय होत असतानाच त्याची सेनापती बापट यांच्याशी भेट झाली. खादीचा साधा पोशाख केलेले तात्या बापट बोलू लागताच त्यांच्या शब्दांतून अंगार फुलत असे. डेक्कन कॉलेजमध्ये शिकत असतानाच बापट यांनी देशभक्तीची प्रतिज्ञा केली. गणितात असामान्य यश मिळविणाऱ्या बापटांना मुंबई विद्यापीठाने शिष्यवृत्ती देऊन इंग्लंडला पाठविले. बापट इंग्लंडला गेले. परंतु इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्याऐवजी बाँब तयार करण्याची विद्या शिकले इंग्रजीत पुस्तिका तयार करून भारतात परतले. काही काळ अज्ञातवासात काढून आणि काही वर्षे तुरुंगवास भोगून सुटका झाल्यावर पां. म. बापट पुण्यात केसरी कार्यालयात काम करू लागले. त्यांचे मन कृती करण्यासाठी उचंबळून येत असे. १९२१ मध्ये टाटा कंपनीने मुळशी धरण बांधण्याचे ठरविले आणि ब्रिटिश सरकारने मावळातील शेतकऱ्यांच्या जमिनी धरणासाठी टाटांना द्यावयाच्या आणि नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांना अल्प मोबदला देण्याचे ठरविले. बापटांचे मन या अन्यायाने पेटून उठले आणि त्यांनी मावळात खेड्याखेड्यातून दौरा करून साध्याभोळ्या शेतकऱ्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. बापटांच्या नेतृत्त्वाखाली, साधेभोळे शेतकरी 'जान देऊ, पण जमीन देणार नाही' अशी घोषणा करून सत्याग्रह करण्यास तयार झाले. शेतकरी त्यांच्या या नेत्याला 'सेनापती' मानू लागले आणि तेव्हापासून बापटांना महाराष्ट्र 'सेनापती बापट' म्हणून ओळखू लागला. मुळशी सत्याग्रह झाला त्या वेळी एस्. एम्. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी होता. मुळशी सत्याग्रहाच्या वार्तांनी पुणे शहर दुमदुमले. त्या वेळी बापट गरिबांसाठी लढत आहेत, इतकेच एस्. एम्.ला उमजले. पुढे तरुणपणी जेव्हा सेनापती बापटांशी त्याची गाठ पडली तेव्हा बापटांच्या धगधगीत देशभक्तीमुळे त्याला बापटांबद्दल मोठा आदर वाटला. बापटांनीही हा तेजस्वी तरुण स्वातंत्र्यासाठी कोणताही त्याग करील, हे अचूक ओळखले.
एस्. एम्.ने बी.ए.ला इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेतले होते. त्यावेळी आर्थिक क्षेत्रात एक घटना घडली, ती म्हणजे सरकारने जमिनीचे तुकडे जोडण्यासाठी एक तुकडे-जोड विधेयक आणले होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा या तुकडे-जोडीस विरोध होता. त्या वेळचे बहुजन समाजाचे पुढारी केशवराव जेधे यांनी शेतकऱ्यांच्या सभा घेऊन विधेयकाविरुद्ध ठराव केले. एस्. एम्.ने त्याचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक वा. गो. काळे यांच्याकडून हा प्रश्न समजून घेतला. त्या वेळी वा. गो. काळे त्याला म्हणाले, 'जोशी, तुला राजकारणात इंटरेस्ट आहे. राजकारणात आर्थिक प्रश्नांना फार महत्त्व असते. स्वातंत्र्याकरिता चळवळ करतानाच गरिबांवर अन्याय करणाऱ्या कायद्यांनाही विरोध करणे आवश्यक आहे, हे विसरू नकोस, वा. गो. काळे हे नेमस्त होते. लिबरल पार्टीबद्दल त्यांना आपुलकी वाटे. परंतु आर्थिक प्रश्नांबाबंत त्यांनी एस्. एम्.ला योग्य मार्गदर्शन केले. गरिबांच्या विरोधी कायद्यांना निदान सनदशीर विरोध आणि त्याची झाला पाहिजे, असे प्रा. काळे यांचे मत होते. नेमस्त प्रवृत्तीचे असूनही प्रा.
काळे यांनी गरिंबांवरील अन्यायाचा स्पष्टपणे जो उल्लेख केला त्यामुळे एस्. एम्.च्या संवेदनशील मनाला त्या अन्यायाची तीव्रतेने जाणीव झाली.
एस्. एम्.च्या सर्वांत थोरल्या बंधूंनी - दादांनी कुटुंबाची जबाबदारी अंगावर घेऊन, कष्ट सोसून ती पार पाडली. एस. एम्.पेक्षा मोठा असेलेल्या बाळू या भावाला पुण्यात नोकरी लागली होती. परंतु दुर्दैवाने त्याला क्षय झाला आणि तो मरण पावला. आणखी दोघे भाऊही अकालीच गेले. दोघी बहिणींची लग्ने झाली होती. एस्. एम.ची आई आणि एक बहीण दादांकडे राहायला गेली झाली होती.