१. विद्यार्थिदशा आणि मनाची घडण - १

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे

१९७६ सालातला मे महिना. रत्नागिरीहून सकाळी निघालेली एस.टी.ची बस अर्ध्या तासात गोळप या लहानशा गावी पोहोचली. तेथे एक उंच, शिडशिडीत बांध्याचे वृद्ध गृहस्थ आपल्या तीन नातवंडांना आणि सुनेला घेऊन उतरले. झपाट्याने चालत त्यांच्या जुन्या घरी पोहोचल्यावर उत्साहाने नातवाला म्हणाले, 'निक्या, हे आपलं घर. इथं माझं लहानपण गेले. आज आपण रत्नागिरीहून पटकन्‌ बसने आलो. पण माझ्या लहानपणी आधी रत्नागिरीला बंदरावर यायचं; मग भाट्याची तर ओलांडली की नंतर बैलगाडीने दोन अडीच तासांनी आम्ही इथं पोहोचायचे.' हे सत्तरी ओलांडलेले वृद्ध गृहस्थ होते. महाराष्ट्रातले थोर समाजवादी नेते एस्‌. एम्‌. जोशी. त्यांच्या बरोबर त्यांची , सून डॉ. कांचन आणि तिची तीन मुले होती. त्यांच्यातला थोरला, ९-१० वर्षांचा अनिकेत. एस्‌. एम्‌. त्याला प्रेमाने हाक मारीत "निक्‍्या”. एस्‌. एम्‌.चा तो फार लाडका होता. तो एकदा आपल्या आजोबांना म्हणाला, 'अण्णा, माझी मुंज का नाही तुम्ही करीत? मुंज केली म्हणजे मला खूप प्रेझेंट्स मिळतील.' त्याचे वडील डॉ. अजेय जवळच बसले होते. ते म्हणाले, 'अरे, अण्णांनी माझी, तुझ्या बजाकाकाचीही मुंज नाही केली.' एस्‌. एम्‌. यावर म्हणाले, 'अजा, तुझी आणि बजाची मुंज केली नसली तरी आता मात्र मी माझ्या पद्धतीनं निक्‍याची मुंज करणार आहे.' सगळ्यांना हे ऐकून आश्चर्यच वाटले. निक्या मात्र खृष झाला.

अनिकेतच्या शाळेला सुट्टी लागल्यावर एस्‌. एम्‌. त्याला, त्याच्या दोन भावंडांना आणि त्यांच्या आईला घेऊन रत्नागिरीस गेले. तेथे ते आबा वणजुंच्या लॉजमध्ये उतरले. सकाळी आंघोळी झाल्यावर एस्‌. एम्‌. म्हणाले, 'चला आता'; आणि ते त्या सर्वांना, लो. टिळकांचा ज्या घरात जन्म झाला होता, त्या घरी घेऊन गेले. तिथे गेल्यावर एस्‌. एम्‌. म्हणाले, 'ही फार पवित्र जागा आहे. इथं बाळ गंगाधर टिळकांचा - ज्यांना आपण लोकमान्य टिळक म्हणतो त्यांचा जन्म झाला. टिळकांचं हायस्कूलचं शिक्षणही .इथं रत्नागिरीतच झालं. टिळकांनी भारताला स्वराज्याचा मंत्र दिला. स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सरकारविरुद्ध लोकांना उठवले, सरकारवर टीका केली म्हणून टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाली आणि सरकारने त्यांना ब्रह्मदेशात मंडालेच्या तुरुंगात ठेवलं. शिक्षा भोगून सुटल्यावर लोकमान्य टिळक पुण्याला परत आले. मी त्या वेळी पुण्याला टिळकांनी स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होतो. तेव्हा एक दिवस आम्ही दहाबारा विद्यार्थी त्यांना नमस्कार करण्याकरिता गायकवाड वाड्यात टिळक राहात तिथे गेलो होतो. लो. टिळक, महात्मा गांधी यांच्यामुळे मी स्वातंत्रय चळवळीत पडलो. निक्या, ही टिळकांची जन्मभूमी. इथं नमस्कार कर.' अनिकेतने, त्याच्या बहिणींनी आणि आईने एस्‌. एम्‌. यांच्याबरोबर लोकमान्य टिळकांच्या छायाचित्राला नमस्कार केल्यावर एस्‌. एम्‌. अनिकेतच्या आईला म्हणाले, 'कांचन, लोकमान्यांच्या घरात आपण आलो. त्यांना नमस्कार केला. हाच खरा संस्कार. मी निक्‍याला, तुम्हांला इथं आणलं तो हा संस्कार करण्यासाठी. हीच त्याची मुंज.' हा संस्कार केल्यानंतर एस्‌. एम्‌. नातवंडांना, सुनेला घेऊन गोळपला गेले. तिथं ते कांचनला म्हणाले, 'मुलांना आपला देश कळला पाहिजे. नुसतं पुण्यात राहून नाही तो समजायचा. निक्याने रत्नागिरीला समुद्र पाहिला, आपलं गाव पाहिलं. आता त्याच्यावर करायचा संस्कार पुरा झाला. आता त्याची मुंज पुरी झाली.' इतकं बोलून एस्‌. एम्‌. नातवंडांना म्हणाले, 'आता इथले आंबे खाल्ले, कोकम सरबत घेतलं, काजूची उसळ, फणसाचे गरे खाल्ले म्हणजे कळेल तुम्हांला आपल्या कोकणाची गोडी.'

कोकणावर एस्‌. एम्‌.चे फार प्रेम होते. बरका फणस तर भलताच आवडायंचा. मी त्यांना एकदा सहज म्हणालो, बरक्‍या फणसातला गरा गिळगिळीत असतो.' ते हसले आणि म्हणाले, तुम्हां घाटावरच्या लोकांना त्याची लज्जत कळायचीच नाही. माझ्यासारख्या कोकण्यालाच ती कळणार.'

बालपण आणि प्राथमिक शिक्षण

गोळप हे एस्‌. एम्‌.चे गाव. पण त्यांचा जन्म मात्र पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरला १२ नोव्हेंबर १९०४ ला झाला. त्यांचे वडील जुन्नरच्या कोर्टात नाझर होते. पाच भाऊ आणि तीन बहिणी अशी आठ सख्खी भावंडे. शिवाय चुलतभाऊ,तात्या सहकुटुंब सहपरिवार, काकी, आई असे हे एकत्र कुटुंब होते. एस्‌. एम्‌. भावंडांमध्ये चौथे. त्यांचे नाव होते श्रीधर. जन्म जुन्नरला झाला तरी श्रीधरचे प्राथमिक शिक्षण मात्र गोळपलाच झाले. प्राथमिक शाळेतील एक मास्तर श्रीधरचे दूरचे काकाच होते. ते छान शिकवायचे. मुलांना वर्गात गणित, हिशोब शिकवतानाच त्यांचे पोस्टाचेही काम चालायचे. बाबूकाकांचा श्रीधरला आणि सगळ्या विद्यार्थ्यांना धाक वाटे. कारण ते मुलांना हात पसरायंला लावून रुळाने मारीत. शाळेचे मुख्य मास्तर होते केळकर. ते विड्या फुंकायचे म्हणून गावात त्यांना 'फुक्या मास्तर' म्हणत. शाळा डोंगराच्या बाजूला होती. मध्ये एक दरड होती. ती फोडून विदयार्थ्यांच्या मदतीने तिथे केळकर मास्तरांनी बाग केली.

गोळप गावात दोन पाठशाळा होत्या. श्रीधरच्या वडिलांनी एकाही मुलाला पाठशाळेत घातले नाही म्हणून गावातील भिक्षुकांचा त्यांच्यावर राग होता. गाव सनातनी होते. गावात जी महार मंडळी होती ती एका रस्त्याने जायची आणि बाकीची माणसे दुसऱ्या रस्त्याने. कारण काय, तर महारांची सावली इतरांवर, विशेषत: ब्राह्मणांवर पडू नये. या सनातनी गावात बायकांना कसे वागवीत असत आणि त्याचा श्रीधरच्या मनावर कसा परिणाम झाला, हे एस्‌. एम्‌. यांनी त्यांच्या 'मी एस्‌. एम्‌.' या आत्मकथनात पुढीलप्रमाणे लिहिले आहे.

लहानपणी एकदा आई उगीचच्या उगीच रागावली, या समजुतीने मी तिच्यावर रागावून घराच्या खालुन पाट वहात होता तिथे जाऊन बसलो. संध्याकाळपर्यंत जेवलोही नाही. आमच्या शेजारी उमाकाकू लेले म्हणून एक विधवा बाई राहात. या उमाकाकूने मला जेवू घातले व घरी आणून सोडले. या उपकारकर्त्या उमाकाकूच्या आयुष्याची पुढे कालान्तराने जी परवड झाली. तिने माझ्या हृदयावर मोठा आघात झाला. ती विधवा होती. कुणाशी तरी तिचा संबंध आला आणि तिला दिवस गेले. तो गर्भ पुढे पाडला म्हणा, काही म्हणा; पण उपदव्यापी लोकांनी तो उचलून आणून आमच्या गावच्या दीक्षितांपुढे ठेवला! दीक्षितांनी उमाकाकूला बोलावून तिची खूप निर्भर्त्सना केली.

उमाकाकूला धरणी पोटात घेईल तर बरे, असे वाटले. ती घरदार सोडून जी गेली ती गेलीच. पुन्हा तिने गाव बघितले नाही. नरसोबाच्या वाडीस भीक मागून तिने आयुष्य संपविले, असे कानावर आले. या घटनेचा माझ्या मनावर परिणाम झाला. फार बोच लागून राहिली. वाटायचे, काय हे! या बाईला माणसासारखेसुद्धा वागवले नाही. तिला जीवनातून उठवले. या घटनेवर आईला विचारण्याइतकी बेचैनी प्राप्त व्हावी इतका मी मोठा झालो होतो. त्या वेळी मी आईला विचारले, 'बायको मेली तर पुरुष लग्न करतो. त्याप्रमाणे नवरा मेला तर बाईला लग्न का करता येऊ नये?' आई म्हणाली, तुला त्यातलं कळायचं नाही.' मी जरा रागातच म्हणालो, 'काय कळायचं नाही? तेव्हा आई म्हणाली, बाईमाणूस मातीच्या भांड्याप्रमाणं असतं. मातीच्या भांड्यात आपण जर काही खाल्लं तर ते फेकून द्यायचं. ते धुवून पुन्हा त्यात खात नाहीत. पुरुष हा धातूच्या भांड्यासारखा आहे. धातूचं भांडं आपण पुन: पुन्हा घासून पुसून वापरतोच को नाही? तसं आहे हे. आईच्या उत्तराचे मला फार आश्चर्य वाटले. बाईच्या बाबतीत एक न्याय आणि पुरुषाच्या बाबतीत वेगळा न्याय. हा त्या वयात माझ्यावरती केवढा मोठा आघात होता!

गोळप या सनातनी गावात महारांना, स्रियांना मिळणारी वागणूक पाहूनश्रीधरचे संवेदनाशील मन दुखावले. काय करावे, हे त्या वेळी श्रीधरला समजत नव्हते. पण मनावरच्या त्या आघाताची जाणीव मोठ्या वयात तीव्रतेने झाली तेव्हा मात्र त्याचे मन अन्यायाविरुद्ध पेटून उठले.

गोळपच्या या ब्राह्मणी संस्कृतीत श्रीधरचे आईवडील वाढले खरे, पण त्यांच्यात उदारता होती. वडील जुन्नरहून आले म्हणजे लाकडे फोडून घेण्यासाठी धन्या या कुळवाड्याला बोलावून घेत. हा धन्या एकदा विषमज्वराने आजारी पडला. श्रीधरची आई धन्यासाठी मऊ भात करायची. स्वत: तो घेऊन जायची. एकदा श्रीधर आईबरोबर गेला होता. धन्याला जेवायला बसवले, भात लोणचे वाढले. एक-दोन घास तो जेवला. पण पुढे त्याला अन्न जाईचना. दोन दिवसांनी तो वारल्याचे कळताच आई रडायला लागली. आसवे टिपता टिपता म्हणाली, गेला बिचारा.'

Hits: 90
X

Right Click

No right click