१८. केतकरप्रशस्ति
१८. केतकरप्रशस्ति
(परिचय - नाशिकचे लो. टिळकांचे व्याही आणि सन्मान्य पुढारी कै. गंगाधरपंत यांच्या स्मृत्यर्थ नगरगृह बांधण्यांत
आलें, त्या केतकर-नगर-गृहाचा पाया घालण्यासाठीं न्यायमूर्ति माधवराव रानडे आले होते. त्यावेळीं विनायकरावांनी
पुढील श्लोक लिहिले. ते त्या वेळी 'लोकसत्ता' ह्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते.)
(शार्दूलविक्रीडित)
सत्कीर्ती विमला वरूनि रमला, जो मातृभूला भला
औदार्ये भरला भवास तरला सत्पुत्र तो शोभला
देशार्थ श्रमला कधीं न दमला त्या सद्यशो-मंदिला
श्रीमत्केतकरा स्वभूहितकरा साष्टांग म्यां वंदिला ।॥ १॥
ना कोणा छळिलें कुशब्द वदुनी सत्प्रेम तें जोडिलें
ज्यानें देशहितार्थ यत्न करण्या स्वार्थाप्रती सोडिलें
व्यापोनी नगरां पुरांस पसरे यत्कीर्ति देशावरी
हा! हा ! निर्दय काल ने झडकरी गंगाधरा सत्वरी ॥ २॥
आधीं देशहितार्थ यत्न करिती असे किती जन्मती ?
त्यामाजी परतंत्र देश अमुचा कुंठीत जेथें मती
अशाही समयीं कसे हरिसि बा या देश-अुद्धारका ?
आर्यांचे कलिजे कसे हिसडसी, दीनांवरी मार कां? ॥ ३ ॥
ज्यांच्या सत्कृति थोर थोर करिती त्यांची वसावी स्मृती
साधूंचीं करिताति यास्तव जनीं हीं स्मारकें सन्मती
आजी नाशिकवासि केतकर जो देवें अम्हां लाभला
त्याचा स्मारकयोग हा जुळतसे आनंद जाला भला ॥ ४ ॥
बांधावें नगरगृहासि ठरलें पाया तया घालण्या
येती 'जस्टिस' रानडे झडकरी मानोनि बोलावण्या
थोरांचे स्तवनार्थ थोरचि भले आम्हांसि याकारणें
झालें दर्शन साधुचे फिटतसे या चक्षुचें पारणें. | ५ ॥।
- नाशिक, १९००