८. एका प्रभाती आलेले पत्र

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता Written by सौ. शुभांगी रानडे

८. एका प्रभाती आलेले पत्र
(वसंततिलका)

झाली प्रभात सुटला बहु थंड वारा ।
जेथें तिथें मुदित हा जन होत सारा ॥

प्रातर्विधी बहु त्वरें उरकोनि घेतों ।
“घ्या पत्र'' हा ध्वनि अकस्मिक कीं निघेतो ॥१ ॥

(भुजंगप्रयात)

उडाली त्वरें एक घाई पुसाया ।
“शिपाई बुवा, काय पत्ता? बसा या." ॥

टकां लावुनी पाहतों तीन भाऊ।
तशी दूर ठाके अभी ती न भाऊ ॥ २ ॥

मनीं सर्व उत्सूक मन्नाम वाचो ।
शिपाई भला तो बहू काळ वाचो ॥

असो पत्र माझ्या सुमित्रेश्वराचें ।
गणी फार आभार विश्वंभराचे ॥३ ॥

(द्रुतविलंबित)

अवचितां ध्वनि गोड अुठावतो ।
परिसतां न सुखा मुळिं ठाव तो ॥

वरि 'विनायक' नायक पत्रिका ।
इतर उत्तर बोलति 'हा ठका' ॥४ ॥

(मालिनी)

झडप झडकरी मी घालुनी पत्र घेतों ।
चकित किति कवीताबद्ध त्याला बघे तो ॥

पुरवि रवि तशी ती पत्रिका कामनाला ।
रविपरिस परी ती तोषदायी मनाला ॥५ ॥

(भुजंगप्रयात)

शशी यद्यपी शीत संतापहा हा ।
तरी विव्हला देत संताप हा हा ॥

रवी सर्व निर्दोष तो तापदायी ।
गुणांच्या सवें दोष हा नित्य राही ॥६ ॥

जरी मी नसे एक वक्ता प्रसिद्ध ।
न वाग्देवता साह्य होवोनि सिद्ध ।।

असें मंद, ना देखिली काव्यशक्ती ।
तरी दोष दावी, क्षमा या असो ती ॥७ ॥

(द्रुतविलम्बित)

विनत हा प्रणिपात शतें करी ।
धरि न राग करां चल दे करीं ।।

जरि न धाडिसि उत्तर लौकरी ।
हरिच संशय, मी बनलो करी ॥ ८ ॥

(भुजंगप्रयात)

तुझा येथ येण्या जरी फार हेतू ।
तरी काल ना योग्य हें जाण हें तूं ॥

असो मी आजारी सहे दु:ख भारी ।
नसे अर्थ काहीं म्हणोनी निवारी ॥ ९ ॥
(१८९९-१९००)

Hits: 158
X

Right Click

No right click