३. स्वदेशीचा फटका
३. स्वदेशीचा फटका
(परिचय : हा फटका सावरकरांनी सन १८९८ मध्ये म्हणजे त्यांच्या वयाच्या १५व्या वर्षी रचला आणि तो त्याच वर्षी
पुण्याच्या जगद्धितेच्छु ह्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला.)
आर्यबंधु हो अुठा अुठा कां मठासारखे नटा सदा ।
हटा सोडुनि कटा करू या म्लेंच्छपटां ना धरूं कदा ॥ १
काश्मीराच्या शाली त्यजुनी अलपाकाला कां भुलतां ।
मलमल त्यजुनी वलवल चित्तीं हलहलके पट कां वरितां? ॥ २
राजमहेंद्री चीट त्यजोनी विटकें चिट तें कां घेतां ।
दैवें मिळतां वाटि इच्छितां नरोटि नाहीं का आतां? ॥ ३
नागपूरचें रेशिम भासे तागपटासें परि परक्या ।
रठ्ठ बनाती मठ्ठ लोक हो मअू लागती तुम्हां कश्या ? ॥ ४
येवलि सोडुन पितांबरांना विजार करण्या सटिन पहा ।
बेजारचि तुम्हि नटावयामधि विचार करतो कोणिन हा ॥ ५
केलि अनास्था तुम्हीची स्वतः मग अर्थातचि कला बुडे ।
गेलें धनची नेलें हरूनी मेलां तुम्हि तरि कोण रडे? ॥ ६
अरे अपणची पूर्वी होतों सकल कलांची खाण अहा ।
भरतभूमिच्या कुशीं दीप ते कलंक आतां अम्ही पहा ॥ ७
जगभर भरुनी अुरला होता नुरला आतां व्यापार ।
सकलही कलाभिज्ञ तेधवां अज्ञ अतां आम्हि रिपु थोर ॥ ८
निर्मियली मयसभा आम्विंचि ना पांडव किरिटी आठवा रे ।
मठ्ठ लोक हो लाज कांहिंतरि? लठ्ठ असुनि शठ बनलोंरे॥ ९
आम्रफलाच्या कोयीमध्यें धोतरजोडा वसे तदा ।
होते जेथें प्रतिब्रह्मेची, धिक् आम्हि जन्मुनि अपवादा ॥। १०
हे परके हरकामि खुलविति भुलविति वरवर वाचेनें ।
व्यवहारी रित असे बराबर सदा हरामी वृत्तीने ॥ ११
कामधेनुका भरतभूमिका असुनि मागे कां ती भिक्षा? ।
सहस्त्र कोसांवरुनी खासा पैका हरतो प्रभुदीक्षा ॥ १२
नेअुनि कच्चा माल आमुचा देती साचा पक्क रुपें ।
आमच्यावरी पोट भरी परि थोरि कशाची तरी खपे ॥ १३
पहा तयांची हीच रीत हो मिती नसे त्या लबाडिला ।
नाना कर्मे नाना वर्मे देश असा हा लुबाडिला ।॥। १४
निमुलीं हातांमधली फडकीं फडकत नाना ध्वज वरतीं ।
हडेलहप्से करुनि शिपाऊ निघत सवारी जगभर ती ॥ १५
नानापरिचे रंग भरीती रंगपुष्प तें दंग करी ।
मोर कावळे पारवे ससे धापद विचरति तीं बकरीं ।॥। १६
राजगृहें गोपुरे झळकती मजले सजले त्यामधुनी ।
सुंदर नारी दु:खहर्षभरि बघती शोभा त्या तरुणी ।॥। १७
नाना जाती पिकली शेती गार हीरवें वस्त्र धरी ।
भात बाजरी गहूं गाजरी आच्छादिलि ही भूमि बरी ॥ १८
अगनग गेले गगन चुंबण्या सवें थोर बहु कोरांकी ।
भास पुरुषची निजांकिं बसवी स्वानंदानें पोरां कीं ॥ १९
नाना असीं विचित्र चित्रे दाविति तुम्हां भुलधंदा ।
तुम्हीहि भुलतां बघतां घेतां क्षणांत स्वपटाला निंदा | २०
याला आतां अपाय बरवा अकी करवा मन भरवा ।
ओतप्रोत अभिमानें हरवा देशी धंदे पट धरवा ॥। २१
परके वरवर कितीहि बोलति गोडगोड तरि मनि समजा ।
सुंदर म्यानीं असे असिलता घातचि होञिल झट अुमजा ॥ २२
रावबाजि जरि गाजि जहाले राज्यबुडाअू तरि मुख्य ।
सख्य असें परक्यांचें यांचें गोष्ट हृदर्यि ही धरु् लख्ख | २३
वैर टाकुं या यास्तव लवकर खैर करो परमेश्वर ती ।
निश्चय झाला मागें अपुला परदेशि पटेंना धरु तीं ॥ २४
चलाचला जाअुं या घेअुं या देशि पटांला पटापटा ।
जाडेंभरडें गडे कसेंही असो सेवुं परि झटाझटा ॥ २५
नास्पर्शू त्या पशूपटाला मअू वर, विखारचि भावू ।
घेऊ खडतर अंतीं सुखकर धर्मचि मानुनियां जाअू ॥। २६
आजवरी जरि भुललों खुललों तत्कपटाला अविचारें ।
जाअूं द्या चला गतगोष्टींचें नको स्मरणची हेंचि बरें 1॥॥ २७
द्रव्यखाणि ही खोरें घेअुनि परकीं पोरें खणती रे ।
अकचित्त या करूगड्यांनो वित्त जिंकु तें पुनरपि रे ॥॥ २८
विशवैधरि ती नारायणि ही यमहरिहर अदि सुरवरिणी ।
कर्मसिद्धिसी दावो नेअूनि मोद देति निजभक्तजनीं ॥ २९
दर अज्ञानी रजनी जावो सांग प्रकाशो रवि थोर ।
वरावयाला रत्नपटाला करो आर्य ते रण घोर ॥ ३०
कवितारूपी माला अर्पी आर्य बुधांला सार्थक हो ।
भक्तांकरवीं मन देवासी सेवायासी अर्पण हो ॥ ३१
- नाशिक, १८९८
॥। _ ह्या फटक्याच्या २९ नि ३० कडव्यांच्या चार ओळींत कविवर्य 'विनायक दामोदर सावरकर' यांनी शब्दाशब्दांच्या आद्याक्षरांतून आपलें नांव कसें चातुर्याने गुंफले आहे तें त्या कवितांतील ठळक आतद्याक्षरांवरून ध्यांनात येईल.