लोकनाट्याचे जनक - शाहीर अण्णा भाऊ साठे भाग - २
दलित, शोषित, पीडित यांनी आपल्यावरच्या अन्यायाचा प्रतिकार करावा तो स्वत: सुशिक्षित होऊन, सुसंस्कृत होऊन, संघटितरीत्या समर्थ होऊन, ही अण्णा भाऊंची प्रामाणिक इच्छा त्यांच्या साहित्यातून उमटलेली आढळते. महाराष्ट्र दलित साहित्य संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या साहित्य संमेलनातील उद्घाटनाच्या (२ मार्च १९५८) भाषणात अण्णा भाऊ म्हणतात, “आम्हाला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे आहे. आम्हाला मांगल्य हवे आहे. आम्हाला मराठी साहित्याच्या थोर परपरेचा अभिमान आहे. कारण मराठी साहित्याची नांदी आमच्याच जीवन-संघर्षाने झडली आहे.
जेव्हा दलिलंची सावली असह्य होती तेव्हा महानुभावपंथीय साहित्यिकांनी सर्वांना ज्ञान मिळाले पाहिजे, ज्ञान हे मोक्ष असे समजून त्यांनी बंड केले, ते आमचे साहित्यिक. माणसाला माणूस म्हणून जपता आले पाहिजे असा दावा मांडून ज्यांनी दलितांच्या भाषेत महाराष्ट्राला सुंदर ज्ञानेश्वरी दिली ते आमचे साहित्यिक आणि चुकलेले महाराचे मूल कडेवर घेऊन जाणारे ते एकनाथ, ते आमचे साहित्यिक. आम्ही आपल्या वर्गांचे इमान पटवून त्याचा उपमर्द होणार नाही याची काळजी घेऊन त्याचे साहित्य निर्माण करू या. या दलिताचे जीवन सुखी व समृद्ध कसे होईल याची काळजी करूया दलिताला नि त्याच्या जीवनाला वरच्या पातळीवर नेण्याचा आपल्या कलेतून प्रयत्न करूया. ” आपल्या दलित, पीडित, शोषित समाजबांधवांचे आयुष्य हा एक उन्नतीचा प्रवास ठरावा, सूडाचा प्रवास ठरू नये ही अण्णा भाऊंची तीव्र इच्छा त्यांच्या पोवाड्यांमध्ये, गीतांमध्ये, लोकनाट्यांमध्ये आणि कथा-नाटक-कादंबऱ्यांमध्येही सातत्याने दिसते.
१९४२ साली संपूर्ण बंगाल प्रांतात भीषण दुष्काळ पडला आणि अक्षरश: लाखो भूकबळी पडू लागले तेव्हा या दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करण्यासाठी मुंबईतील साम्यवादाचा प्रभाव असलेल्या कलावंतांनी एकत्र येऊन 'इप्टा' या संस्थेची स्थापना केली आणि कार्यक्रमांची मालिका सादर करण्याची योजना आखली. या कार्यक्रमासाठी बंगालच्या आपत्तीवर एक पोवाडा स्वत: रचून तो सादर करावा, असे अण्णा भाऊंना वाटले आणि त्यांच्यातील 'अभिजात शाहीर' प्रकट झाला. 'बंगालची हाक या त्यांच्या पहिल्या पोवाड्यापासून पुढील सर्व सुमारे १४-१५ पोवाडे या अण्णा भाऊंच्या कविमनाने अन्यायाविरुद्ध नोंदविलेल्या प्रखर प्रतिक्रियाच होत्या, मग तो अन्याय निसर्गाने माणसावर केलेला असो किंवा एका माणसाने दुसऱ्यावर केलेला असो.