लोणावळा-खंडाळा
मुंबई-पुणे महामार्गावर ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील ही दोन्ही ठिकाणे थंड हवेसाठी प्रसिद्ध आहेत. या दोहोत केवळ पाच कि.मी. इतकेच अंतर आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटतं. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुकं लपेटूनच फिरावं लागतं. उन्हाळयात जांभळं आणि करवंदीची लयलूट असते. या दोन्ही ठिकाणांपासून जवळच पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. राजमाची पॉइंर्ट, वळवळ धरण, टायगर्स लिप, ड्युक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर ही त्यापैकी ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे. |