नृसिंहवाडी
|
|
नृसिंहवाडीचे क्षेत्र कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या मधोमध सुमारे एक चौरस मैल परिसरात पसरले आहे. गावची लोकसंख्या सुमारे चार हजारापर्यंत आहे. कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली सुंदर व मनोरम असे मंदिर आहे. मंदिरातच स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत. म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात.
सांप्रत उभे असलेले मंदिर विजापूरला अदिलशहा या मुसलमान बादशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून बादशहा नृसिंहवाडीस आला. त्याने श्री गुरूंचे दर्शन घेतले व नवस बोलला. पुजाऱ्याने अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळयाला लावला असता, तिला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे बादशहा आनंदित झाला. त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिल्याची नोंद आढळते. सध्या उभे असलेले श्री गुरुमंदिर विजापूरच्या मुसलमान बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही, तर लांबट आकाराची उंच अशी वास्तू आहे आणि त्यासमोरच कृष्णेचा विस्तीर्ण घाट व कृष्णा नदी संथ वाहत आहे. या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूंनी उंच व विस्तृत खांब आहेत. |