शनि-शिंगणापूर
|
अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्नला परिचित आहे. येथे श्रीशनैश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती ५ फूट ९ इंच उंचीची आहे. या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका भाविकात प्रचिलित आहेत. विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होय. मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही. नजिकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते. या लहानशा गावाची लोकवस्ती सुमारे ३००० असेल पण येथील घरांना दरवाजे नाहीत याचे आश्चर्य वाटते. अगदी जगावेगळे असलेले हे देवस्थान चमत्कारांमुळे खूप प्रसिद्ध पावले आहे. देव दर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते. स्त्रियांना मात्र चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास मनाई आहे. दुरून दर्शन घेता येते. दर्शनापूर्वी आंघोळ करून शुचिर्भूत होणे आवश्यक असते. आंघोळीची व्यवस्था देवस्थानाच्या आवारात कायम आहे. शनि अमावस्या व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते. शनि जयंतीस (वैशाळी अमावस्या) येथे उत्सव साजरा होतो. |