देवीच्या शक्तीपीठापैकी हे आद्यपीठ. उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता असून रामदास स्वामी हे देखील उपासक होते. |