१६. किसान-कामगारांचे कैवारी -३

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

१६. किसान-कामगारांचे कैवारी -३

मध्यंतरी धुळ्याच्या गिरणीकामगारांवर उपासमारीचे संकट उद्‌भवले होते. गिरणीमालकांनी कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाहीतच, परंतु गिरणीलाही कुलपे ठोकली. गिरणी बंद ठेवल्याने अनवस्था प्रसंग निर्माण झाला. गुरुजींनी या
लढ्यात लक्ष घातले. वाटाघाटीचे सर्व मार्ग संपल्यावर व मालक हटवादी भूमिका सोडीत नाहीत असे पाहिल्यावर गुरुजींनी १३ सप्टेंबर १९३९ रोजी दुपारी बारापर्यंत गिरणीचे दरवाजे उघडले नाहीत तर तापी नदीत जलसमाधी घेण्याची घोषणा केली. ही बातमी सर्वत्र पसरली आणि मोठी खळबळ माजली. धुळे शहरातील वातावरण फारच तापले. गुरुजींच्या साहाय्याला सेनापती बापटही धावले. त्यामुळे पुन्हा वाटाघाटी होऊन गिरणीमालकांनी माघार घेतली. कामगारांवरचे संकट दूर झाले. गुरुजींनी हाही लढा जिंकला!

त्याच वर्षी १९३९ साली पूर्व खानदेशात बरीच अतिवृष्टी झाली. शेतातले पीक बुडाले. ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर हलाखीची स्थिती आली. ठिकठिकाणांहून हलाखीच्या बातम्या येऊ लागल्या. गुरुजी अस्वस्थ झाले. काँग्रेस कमेटीने पाहणी करून चार आणेसुद्धा पीक नाही, असा अहवाल दिला होता.अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करू नये, सारामाफी द्यावी, अशी मागणी गुरुजींनी एका कामगार परिषदेत ठरावाद्वारे केली होती. कलेक्टरलाही ही मागणी कळवली होतो. शेतकऱ्यांच्या गाऱ्हाण्यांना वाचा फोडण्यासाठी व शेतसारा माफ करून घेण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी किसानपरिषदा भरविण्याचे ठरले. गुरुजींच्या पायांना पुन्हा पंख फुटले. ते सर्वत्र फिरू लागले. एका गावातील सभेत त्यांनी “येत्या २६ जानेवारीला स्वातंत्र्यदिनी पूर्व खानदेशातल्या हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा जळगावला कलेक्टर कचेरीवर नेऊया; त्यासाठी तयार रहा !” अशी हाक दिली. गुरुजींची ही हाक सर्व जिल्हाभर पोहोचली. १९३९ च्या जानेवारीत गुरुजी
वाऱ्यासारखे जिल्हाभर फिरले. बोलले. या झंजावाती दौऱ्यात काही तरुणही बरोबर असत. याही वेळी गुरुजींनी प्रचारासाठी स्फूर्तिदायक गीते लिहिली होती. त्यावेळी पुढील किसानगीत फारच प्रसिद्ध झाले होते -

येथुन तेथुन सारा पेटू दे देश, पेटू दे देश ॥
कोटि कोटि आता उठू दे किसान
निर्भयपणे अपुली उंच करा मान
मुक्तकंठे गावो स्वातंत्र्याचे गान
नष्ट करू आता आपुले सरे क्लेश ॥

कमवता तुम्ही, गमवता कसे
सिंह असुन तुम्ही, बनलात रे ससे
तेजे उठा आता, पडा ना असे
माणसे बना आता, बनु नका मेष ॥

रात्रंदिवस तुम्ही करीतसा काम
जीवनात तुमच्या उरला नाही राम
घाम गळे तुमचा, हरामाला दाम
येवो आता तुम्हा थोडा तरी त्वेष ॥

मोर्चे काढा आता निघू दे फौजा
लुटारूंच्या आता थांबवू या मौजा
चालू देणार नाही कोणाच्या गमजा
कोटि किसानांचा फणा करी शेष ॥

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 95
X

Right Click

No right click