लोकनाट्याचे जनक - शाहीर अण्णा भाऊ साठे भाग - ६
वारणाकाठच्या परिसरात, वाटेगावात अण्णा भाऊंनी ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची, दलित-शोषितांची जी दु:खे समरसून पाहिली तीच या नाटकातही उमटावीत यात नवल काय?
पोवाडे, गीते, नाटक या सा-यातून ज्या साम्यवादी विचारांचा, श्रमिकांच्या समस्यांचा प्रभाव दिसून येतो त्या साम्यवादाची जन्मभूमी असलेल्या सोविएत रशियाला जाण्याचे अण्णा भाऊंचे स्वप्न १९६१ साली जेव्हा प्रत्यक्षात उतरले तेव्हा आनंदाने ते पार हरकूनच गेले. एका सच्च्या श्रमिकाच्या कलावन्त मनाला दिसलेला रशिया 'माझा रशियाचा प्रवास' या छोटेखानी पुस्तकात आपल्याला भेटतो. या संपूर्ण प्रवासवर्णनाचा ढाचाच पार वेगळा आहे. मॉस्कोतोल किंवा बाकूतील पर्यटनस्थळे, सौंदर्य या वर्णनापेक्षा अण्णा भाऊ अधिक रमतात ते तिथल्या माणसांच्या अंतरंगात. मॉस्कोतील 'सोविएत स्काय' हॉटेलात प्रथम भेटलेले दुभाषी डॉ. बारनिकोव, लेनिनग्राडच्या मराठीच्या प्राध्यापिका तातियानाबाई, लेनिनग्राड विश्वकिद्यालयातील विद्यार्थी, रस्त्यावरील सामान्य नागरिक, अण्णा भाऊंना 'शाहीरे अझोज' म्हणणारे बाकूमधील डॉ. हमीद, या सर्वाशी आत्मीयतेने साधलेल्या संवादातून अण्णा भाऊंना रशियातील 'माणूस' पाहायचा होता.
प्रेमात पडलेल्याला प्रिय व्यक्तीचे सारेच सुंदर वाटते. अण्णा भाऊ साम्यवादाच्या प्रेमातच पडल्यामुळे त्यांना रशिया म्हणजे भूलोकीचा स्वर्गच वाटला हे त्यांच्या प्रवासवर्णनातून जाणवतेच. परंतु साम्यवादी देशातील सामान्य माणसाच्या खोल मनात दडलेले सत्य शोधण्याचा अण्णा भाऊंचा प्रमाणिक प्रयत्न आपल्या वेगळेपणाने अधिक काळ स्मरणात राहतो.
साम्यवादी रशियाला भेट देण्याची संघी अण्णा भाऊंना बरीच उशिरा (१९६१ साली) मिळाली असली तरी साम्यवादाशी त्यांची ओळख १९४०च्या आसपास झालीच होती. शोषितांना शोषणमुक्त करण्याचे, एक स्वतंत्र माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचे आश्वासन देणारे साम्यवादी तत्त्वज्ञान त्यांच्या मनात खोलवर ठसले आणि हा ठसा त्यांच्या साहित्यावर आणि सर्वाधिक स्वरूपात त्यांच्या लोकनाट्यांवर उमटलेला आढळतो.
आपल्या भोवतालच्या बदलत्या वास्तवाचे आणि बदलत्या सामाजिक जाणिवांचे भान ठेवून जो साहित्यप्रकार जन्म घेतो तो त्या त्या समाजाच्या जनमानसाची पकड घेतोच. वस्तुस्थितीचे उत्तम उदाहरण म्हणून अण्णा भाऊंच्या लोकनाट्यांचा निर्देश करता येईल.
Hits: 171