लोकनाट्याचे जनक - शाहीर अण्णा भाऊ साठे भाग - ५
अण्णा भाऊंच्या कविमनाला निसर्गसौंदर्याची किती भुरळ पडत होती त्याची साक्ष त्यांच्या गीतांमधून प्रकर्षाने दिसून येते. 'पुर्वेला जाग आली, मोहरली लाली" या गीतात अण्णा भाऊ म्हणतात,
'भाळी तिलक तिने रेखिला ।
लेवून पुरला, गुलाल उरला |
नभातून तिने फेकिला ।
पहाटे पूर्व दिशा उजळली की तिची लाली केवळ आकाशात पसरते असे नव्हे तर चराचरावर उमटते, ही वस्तुस्थिती आपण सरिच पाहत असलो तरी अण्णा भाऊंना मात्र पूर्वेने कपाळावर कुंकवाचा टिळा रेखून, उरलेला गुलाल आसमंतात उधळलेला दिसला.
'रवि आला लावुनी तुरा' हे नितान्त सुंदर गीत तर संपूर्णच आस्वादायला हवे. सूर्याच्या आगमनाने पृथ्वीवर पसरलेले चैतन्य आणि ओसंडणारा आनंद या गीतात अण्णा भाऊंनी हळुवारपणे टिपला आहे.
'पानापानांत नाचे हा वारा ।
भूप रागाच्या छेडीत तारा ।
हासे कोकीळ मनी ।
मोर माचे वनी ।
सप्तरंगांचा फुलवून पिसारा ।
म्हणून अण्णा भाऊंनी सूर्योदयाचे एक देखणे शब्दशित्प निर्माण केले आहे.
'लावणी'च्या सौंदर्याला सोबत घेऊन वाढलेल्या अण्णा भाऊंच्या कविमनाने निसर्गातील सौंदर्यकण नेमके वेचून आपल्या गीतात गुंफावेत यात नवल ते काय? रसिकमनाला मोहविणारी ही गीते महाराष्ट्राला भावली ती यामुळेच.
“इनामदार? हे अण्णा भाऊंचे एकपेव नाटक. त्यातही खेड्यातील 'सावकारी पाश शेतकऱ्यांभोवती कसे आवळले जातात आणि माणसे गुन्हेगारीला कां प्रवृत्त होतात, आपल्या फायद्यासाठी धनदांडगे त्यांचा कसा वापर करून घेतात याचे विदारक चित्र अण्णा भाऊंनी रेखाटले आहे. गमतीचा भाग असा को, या नाटकांचे प्रयोग मराठीत झाले नाहीत; परन्तु हिन्दी रंगभूमीवर मात्र हे नाटक लोकप्रिय ठरले! ए. के. हंगल वगैरे “डाव्या' मंडळींच्या अभिनयाइतकेच त्याचे श्रेय अण्णा भाऊंच्या सकस लेखणीलाही द्यायला हवे. लोकनाट्यावर जबरदस्त पकड असलेल्या अण्णांना नाट्यलेखन अवघड नव्हतेच. लोकनाट्यातील रसरशीत बोलीभाषा इथे न वापरता सावकार, कारकुनांना शोभेल अशी भारदस्त भाषा अण्णा भाऊंनी लीलया वापरली आहे याकडे मुद्दाम लक्ष वेधायला हवे.
Hits: 188