लोकनाट्याचे जनक - शाहीर अण्णा भाऊ साठे भाग-१

Parent Category: मराठी पुस्तके Category: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे Written by सौ. शुभांगी रानडे

लोकनाट्याचे जनक - शाहीर अण्णा भाऊ साठे
वसुंधरा पेंडसे- नाईक

"सामाजिक बांधिलकी" हा शब्द आपण अलीकडे सरसकट वापरत असलो तरी त्याचा नेमका कोणता अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो हे निश्चितपणे सांगा येणे जरासे अवघडच आहे. प्रत्यक्षात, ज्या समाजात आपण जन्मलो, वाढलो. त्या समाजाबद्दल वाटणारी कृतज्ञता आणि आस्था व्यक्त करण्यासाठी, त्या समाजाच्या प्रगतीला हितकर आणि उपयुक्त अशी कृती करण्याची तीव्र इच्छा म्हणजे सामाजिक बांधिलकी असे म्हणता येईल. ज्यांच्या आयुष्याकडे आणि साहित्याकडे पाहिल्यावर या व्याख्येची यथार्थता पटावी असे उदाहरण म्हणजे शाहीर अण्णा भाऊ साठे!

प्रतिभेचे लेणे कुणा भाग्यवन्ताला लाभेल हे सांगता येणे कठीण. नाहीतर, वाटेगावच्या गावकुसाबाहेर मातंग समाजात जन्मलेला अण्णा भाऊ साठे नावाचा मुलगा, ज्याला वयाच्या १५- १ ६व्या वर्षापर्यंत धड अक्षरओळखही झालेली नव्हती, तो अगदी साहित्यातील मानसन्मान मिळवितो, 'फकिर' या त्याच्या बावनकशी कादंबरीची सोळावी आवृत्ती निघते, मराठीव्यतिरिक्त भाषा माहीत नसलेला हा अभिजात कलाकार रशियाला जाऊन येतो आणि त्याच्या साहित्यकृतींची भाषांतरे केवळ भारतीय नव्हेत तर भारताबाहेरील भाषांमध्येही केली जातात. या अघटिताचा अर्थ कसा लावायचा.

भाऊ मांगांच्या घरत जन्सलेल्या अण्णांनी दारिद्र्य फार कोवळ्या वयात अनुभवले, समाजाच्या उपेक्षेचे चटके सहन केले, वेठविगागीतील अपानुष पिळवणूक भोगली, गिरणीकामगारांच्या हालअपेष्टा आणि शोषण सोसले आणि झोपडपट्टीतील बकालपणाची सोबतही केली. इतके अपार दुःख भोगलेल्या अण्णांच्या साहित्यात कुठेही आक्रस्ताळेपणा, तळतळाट, समाजाला शिव्याशाप किंवा अन्याय करणाऱ्यांना खलास करण्याची भाषा
आढळत नाही, हे त्यांचे ठसठशीत वैशिष्ट्य प्रकर्षाने जाणवणारे आहे. समाजाकडून ज्यांच्यावर अन्याय होतो, त्यांच्याकडून दोन प्रकारच्या प्रतिक्रिया झालेल्या नेहमीच आढळतात. अन्यायाचा प्रतिकार करताना, ज्यांनी अन्याय केला त्यांना 'जशास तसे" उत्तर देऊन अद्दल घडविणे ही त्यातील एक प्रतिक्रिया असते. दुसऱ्या प्रतिक्रियेत अन्यायाबद्दल चीड असते, त्याचा प्रतिकार करण्याची जिद्दही असते. परन्तु त्या अन्यायापाठची कारणे शोधून ती नाहीशी करण्याची तळमळ असते. ज्यांनी अन्याय केला त्यांच्यावर संतापण्याऐवजी, ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्याबद्दलची सहानुभूती, आस्था, आत्मीयता अधिक तीव्र असते. अपार करुणा आणि संपूर्ण मानवजातीच्या हिताची मनीषा तिथे सामावलेली असते. येशू ख्रिस्त, भगवान बुद्ध, ज्ञानोबा माऊली यांच्या डोळ्यांतून पाझरणाऱ्या करुणेचा आणि मनात दाटलेल्या मानवहिताच्या मनीषेचा अंश ज्यांना लाभतो त्यांच्या कृतीत, उक्तीत, साहित्यात सृजनाची बीजे आढळतात, संहाराची नव्हेत. अण्णा भाऊंच्या साहित्यात हेच दिसून येते.

Hits: 238
X

Right Click

No right click