Designed & developed byDnyandeep Infotech

घर

Parent Category: मराठी साहित्य

गरीब-श्रीमंत, रंक-राव, मालक-नोकर, राजा-प्रजा अशा प्रत्येकालाच आपापले घर असते. अगदी पक्षीसुद्धा आपापले घरटे बांधतात. आणि कसेही असले तरी ज्याचे त्याला घर आवडते असते हेही तितकेच खरे. त्याची एक विलक्षण ओढ असते. मग भले ते स्वतःच्या मालकीचे असो वा भाड्याचे. आपण पाहुण्यांच्या घरी गेलो तरी तेथे चार-आठ दिवस बरे वाटते. पण नंतर मात्र केव्हा एकदा आपल्या घरी जातो असे होऊन जाते. म्हणतात ना,
‘ज्याचं त्यालाच घर प्यारं।
बोलक्या भिंती नि हसरी दारं॥

यावरून सहज आठवण झाली ती पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या पेंडसे चाळीतल्या आमच्या घराची! चाळीस पन्नास बिर्‍हाडे होती चाळीत. त्यात दोन भाग होते. एक जुनी चाळ व दुसरी नवी चाळ. जुनी चाळ प्रत्येकी दहा बिर्‍हाडांची दोन मजली होती. तिच्या शेजारीच नवी चाळ उरलेल्या तीन बाजूंनी प्रत्येकी तीन मजली होती. दोन्हीला मिळून एकच पेंडसे चाळ असे नाव होते. चाळीतील सर्वजण गुण्यागिविंदाने नांदत असत. मधोमध भले मोठे अंगण. त्यातच एका बाजूला
एक पुरूषभर खोलीचा, फरसबंद पाण्याचा हौद. त्याच्या शेजारीच एक मोठे नारळाचे व एक पारिजातकाचे झाड होते. पारिजातकाची फुले सार्‍या चाळीला पुरून उरत. भल्या पहाटे उठून लवकर फुले वेचायला जाण्याची प्रत्येकालाच घाई असे. ती ताजी टपोरी सुवासिक फुले मनाला विलक्षण भुरळ पाडत. अशा या चाळीत तिसर्‍या मजल्यावरील कोपर्‍यातील एक खोली म्हणजे आमचे घर. म्युनिसिपालिटीचे पाणी आमच्या घरातील नळापाशी येईतो पार थकून जात असे आणि म्हणूनच ‘येऊ का नको, येऊ का नको’ असे करीत असे. त्यामुळे आम्ही खांद्यावर घागर व एका हातात बादली घेऊन खालच्या हौदाजवळील नळावरून पाणी भरत असू. प्यायचे व वापरायचे असे मिळून २५-३० खेपा कराव्या लागत. पुढे आम्ही रहाटासारखी लोखंडी पुली लावली. तिच्यावर मोठा दोर सोडून त्याला घागर बांधून पाणी खालून वर ओढून घेत असू. दोर जाडजूड होता. तो ओढताना सुरूवातीला हाताला काचून घट्टे पडत. पण सवयीने त्याचेही काही वाटेनासे झाले. कारण पाणी मिळतंय याचाच आनंद अधिक होता. तर अशी ती आमची एक खोली व समोरची गॅलरी ही जागा आम्हाला अगदी भरपूर वाटत असे. पण खरं सांगू का चाळीची मजा काही औरच!

लग्नानंतर सांगलीतील सिटी हायस्कूलजवळच्या चिंचेच्या बोळातील पोंक्षे वाड्यात आम्ही राहात असू. ओटी, पडवी, माजघर, स्वयंपाकघर असे आगगाडीच्या डब्यासारखे लांबलचक घर होते ते! मातीच्या भिंती चांगल्या जाडजूड असल्याने घरात गारवा भरपूर. इतका की पंख्य़ाची मुळीच गरज भासत नसे. दररोज सकाळी दारात एक पांढरी शुभ्र गाय येत असे. ती आली की आबा (आमचे सासरे) म्हणत, ‘गाय आलीय बरंका. तिला पोळी भाजी आणा हं’. मग आजी (आमच्या सासूबाई) मोठ्या लगबगीने पोळी व भाजीपाल्याची देठे वगैरे घेऊन तिच्या स्वागताला जात. तिच्या कपाळावर कुंकवाचा लहानसा टिळा लावून तिला खायला देत. तोपर्यंत आबा गायीच्या पाठीवरुन शांतपणे हात फिरवीत असत.

ओटी, पडवी वगैरे खोल्यांतून फरशी होती. पण माजघरात मात्र मातीची जमीन होती. ८-१५ दिवसांनी आजी ती जमीन शेणाने सुरेख सारवीत आणि त्यावर मधोमध एक लहानशी रांगोळी काढीत. माजघरातच एक उखळ पुरलेले होते. त्यात ३-४ महिन्यांनी घरीच गोडा मसाला केला जाई. कांद्याची आमटी, भाकरी, लसणीची चटणी आणि ताकभात हा रोज रात्रीचा आमच्या घरातला जेवणाचा बेत सर्वांना फार आवडे. आजींच्या हातच्या कांद्याच्या आमटीची सर कशालाही येत नसे. असे ते घर माझ्या मनात कायमचे घर करून राहिले आहे ते तेथील मातीविटांच्या भिंतीमुळे नव्हे तर त्या घरात राहणार्‍या अत्यंत सुस्वभावी अशा माणसांच्यामुळे!

आता आम्ही स्वतःचे लहानसे बंगलेवजा घर बांधले आहे. सभोवती नारळ, आंबा, फणस, केळी, पेरू, सीताफळ. लिंबू इत्यादी फळझाडे आहेत. जाईजुईसारखे वेल आहेत. पारिजात, मोगरा, गुलाब, सोनचाफा इत्यादी सुवासिक फुलझाडे आहेत. मांजर, कुत्री आणि बुलबुल, कोकिळा इत्यादी विविध प्रकारचे पक्षी असे नैसर्गिक सोबती आहेत. मुले नोकरिनिमित्त परगावी, परदेशी आहेत. कधीमधी येतात तेव्हा मुला नातवंडांनी घराचे ‘गोकुळ’ होऊन जाते.

X

Right Click

No right click