वुईमेन्स एज्युकेशन सोसायटी - ज्ञानगंगोत्रीचा उगम

Parent Category: ROOT Category: संस्था परिचय Written by सौ. शुभांगी रानडे

वुईमेन्स एज्युकेशन सोसायटी -ज्ञानगंगोत्रीचा उगम

“वटवृक्षाचे बीज मोहरीहूनही लहान असते. परंतु त्यात जी स्फूर्ती असते जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून, त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात; उन्हाचे श्रान्त झालेल्याना तो वटवृक्ष सावली देतो.” -स्वा. सावरकर

वुईमेन्स एज्युकेशन सोसायटीचा गेल्या अर्धशतकाचा इतिहास चाळताना या वाक्याचा अर्थ मनावर पुरेपूर ठसतो-त्याची सूचकता, चित्रमयता जाणवते.

तसे पाहिले तर भारताच्या तर राहोच, पण महाराष्ट्राच्या नकाशावरही सांगली म्हणजे एक लहानसा ठिपका. एका लहानशा पटवर्धनी संस्थानची ही लहानशी राजधानी. परंतु २९ जून १९१० या दिवशी कु. कमला जोशी या अमरावतीच्या एका सुसंस्कृत कन्येचा विवाह सांगलीच्या हिज हायनेस श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्याशी झाला. कमला लक्ष्मी होती ती सरस्वतीदेवी होऊन प्रजाजनांची राणी झाली.

इतिहास सांगतो की १९१७-१८च्या सुमारास सांगली संस्थानाचे एज्युकेशनल इन्स्पेक्टर कै. श्री बापूसाहेब परांजपे यांच्या पत्नी कै. रमाबाई परांजपे यांनी आपल्या भगिनी कृष्णाताई यांच्या साहाय्याने प्रौढ स्त्रियांसाठी एक साक्षरता व शिवणकला शिकविण्याचा वर्ग घरी चालू केला होता. राणी-साहेबांच्या प्रोत्साहनाने त्याचे महिला विद्यालयात' रूपांतर झाले जागा मिळाली, राजाश्रय लाभला, १९१९मध्ये देखरेखीसाठी शहरातील प्रतिष्ठित नागरिक स्त्रीपुरूषांचे एक वुईमेन्स एज्युकेशन बोर्ड नेमण्यात आले.

१९२५ मध्ये राणीसाहेब सेवासदन पुणे, या विख्यात संस्थेच्या अध्यक्षा झाल्या आणि तेथील अनुभवाचा फायदा मिळून महिला विद्यालयास शिवण, भरतकाम व इंग्रजी इयत्ता १ ते ३ ची जोड दिली गेली.

१९२५ हेच वर्ष. या वर्षी महर्षि कर्वे सांगलीस आले आणि स्थानिक मंडळींच्या साहाय्याने त्यानी कन्याशाळा मंडळ व इंग्रजी इयत्ता ४ ते ७ ची कन्याशाळा स्थापन केली.

श्री भाऊसाहेब वाडेकर या उत्साही पेन्शनर गृहस्थांच्या माडीवर वर्ग भरू लागले. त्यानी रामभाऊ देवल वगैरेंच्या साहाय्याने व महर्षींच्या प्रेरणेने आर्थिक मदत मिळवीत ही ज्योत तेवत ठेवली. याच कन्याशाळेत स्वी-शिक्षण-मंडळाचे आद्य संस्थापक आजीव सदस्य श्री. का. गो. तथा आप्पा शिराळकर (१९२९) श्री. ना. ह. खाडिलकर (१९३०) श्री. म. गो. तथा आण्णा शिराळकर (१९३१) व श्रीमती मनूताई पडळकर (१९३२) हे शिक्षक म्हणून अत्यल्प वेतनावर काम करीत होते. महिला विद्यापीठाच्या मॅट्रिक परीक्षेस मुलींना बसविले जाई;. कन्याशाळा मंडळाचे अध्यक्ष होते डे. एज्यु. सोसायटीच्या विलिंग्डन कॉलेजचे प्रा. द्रवीड.

स्त्रीशिक्षणास अत्यंत प्रतिकूल अशा त्या काळात दोन्ही शाळा-महिला विद्यालय व कन्याशाळा-संख्येच्या अभावी कशातरी जीव धरून होत्या. पहिलीला राजाश्रयामुळे आर्थिक सवलत होती. दुसरीजवळ स्वार्थत्यागी, उत्साही पण निर्धन असे ध्येयवादी लोक होते.

१९३२ अखेरीस डबघाईला आलेल्या या दोन्ही शाळांचे परस्पर विलिनीकरण करण्याची कल्पना पुढे आली होती. दि. १६-७-१९३३ चा ज्ञानप्रकाश सांगलीत दि. ११-७-१९३३ या दिवशी भरलेल्या नागरिक सभेचा वृत्तांत देतो -

“प्रो. कर्वे मुद्दाम पुण्याहून आले होते. अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. प्रो. कर्वे म्हणाले, “महिला विद्यापिठापुढे अडचणी वाढत चालल्या आहेत. आम्ही मदत करू ही अपेक्षा धरू नये. सांगलीत मुलींच्या दुय्यम शिक्षणास अनुकूल काळ निर्माण होऊन बराच काळ लोटला आहे. अशा स्थितीत शाळा चालवायची की नाही ते नागरिकानी पहावे. मिशनरी लोकानी चालविली तरी चालेल. पण मुलींचे शिक्षण व्हावे ही इच्छा.”
ज्ञानप्रकाशाचा वार्ताहर पुढे लिहितो “कर्वे यांच्या भाषणात निराशा व उद्‌विग्रता होती. बोलताना एक दोनदा कंपही आला.”

महर्षीचे हे आव्हान नागरिकांनी स्वीकारून कन्याशाळा चालूच ठेवण्याचा निश्चय केला. कालपुरूषही सर्वांना एका ध्येयाकडे खेचत होता. दोन्ही शाळांच्या संगमाचा सर्वच तपशील अतिशय रोचक व रोमांचक असला तरी स्थलाभावी एवढेच सांगणे भाग आहे की १९३३ च्या सप्टेंबर महिन्यात, विजयादशमी सुमुहूर्तावर, बडोदा संस्थानच्या महाराणी चिमणाबाईसाहेब गायकवाड यांच्या भेटीचे निमित्त साधून दोन्ही शाळा एक झाल्या व २५
सप्टेंबरला वुईमेन्स एज्यु. सोसायटी अस्तित्वात आली व विजयादशमीस दि. सप्टेंबर रोजी 'गर्ल्स हायस्कूल" हे इ. १ ते ७ चे हायस्कूल स्थापन झाले. हीच सोसायटीची व कन्या प्रशालेची गंगोत्री होय!

लेखाच्या आरंभी मोहरी एवढ्या बीजातून प्रचंड विस्तार पावलेल्या वटवृक्षाचा दृष्टांत आला आहे. या ज्ञानाचा वटवृक्षाखाली खरोखरच आज दोन अडीच हजार कन्या विसावल्या आहेत. ज्ञानदुग्ध पिऊन तुष्टि पुष्टि पावत आहेत. पन्नास वर्षातील ही किमया कुणा अमूक व्यक्तींनी केली हे सांगण्यात मतलब नाही. अखेर तो गोवर्धनभारच आहे. परंतु त्याग, निष्ठा, ध्येयवाद, मितव्यय, प्रामाणिकपणा, लोकसंग्रह व एकजूट या सप्तगुणांचे जोरावर हे महान्‌ कार्य घडून आले आहे हे सांगितले पाहिजे. शिशुवर्गापासून पदव्युत्तर वर्गापर्यंत शिक्षण देणारी स्वतंत्र स्त्रीसंस्था आज अभिमानाने उभी आहे.
संस्थेचा प्रवास अखंड चालूच असतो. ती टप्प्याची शर्यत असते. एकाचे निशाण घेऊन दुसऱ्याने पुढे धावत जायचे असते. यात कुणाला नाईक म्हणतात, कुणाला पाईक! पण यश.:श्रेय सर्वांचे!

अजून खूप करावयाचे आहे. ऋणे फेडायची आहेत आर्थिक ऋणे! व्यक्तिऋणे फिटत नसतातच! अजून खूप बांधकाम करायचे आहे - इमारतींचे ! आणि हृदयांचेही ! अजून कित्ते घालून द्यायचे आहेत, दुर्दम्य ध्येयवादाचे व ज्वलंत निष्ठांचे !

ते तर केलेच पाहिजे. परंतु आज आपण सर्वांनी कृतज्ञता, कर्तृत्वाचे कौतुक व कृतार्थतेची भावना यांची स्मृती जागावायची आहे. संस्थेची पायाभरणी करताना खपलेले पायाचे दगड आणि उदारहस्ते द्रव्य देणारे दाते यांचेबद्दल कृतज्ञता ! ज्यांच्यासाठी एवढा अट्टहास त्या विद्यार्थिनींच्या अद्वितीय कर्तृत्वाचे हृदय भरभरून कौतुक ! आणि चिमण्यांचे गरूड करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे गुरूजन यांच्या कृतार्थतेचा मर्मबंधातील ठेवीच्या
मोलाचा भावबंध ! तूर्त एवढीच अल्प इच्छा!

Hits: 306
X

Right Click

No right click