काव्यदीप

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक - १.आई Written by सौ. शुभांगी रानडे

काव्यदीपा हाती धरोनी
अमर तुला करणार
माऊली सदा तुला स्मरणार ----------धृ.

आम्हाला जरी सोडून गेलीस
काव्यधना परी देऊन गेलीस
सकलांना ते वाटून देण्या
कधी न विस्मरणार
माऊली सदा तुला स्मरणार ----------१

काव्यज्योतिच्या रूपे तुझिया
स्वर पडती तव कानी माझिया
दीपामधल्या स्नेहाला मी
कमी न पडू देणार
माऊली सदा तुला स्मरणार --------२

काट्यामधूनी गुलाब फुलवित
सजविलेस तू अमुचे जीवित
जरतारी हे काव्यवस्त्र मी
लेऊनिया जगणार
माऊली सदा तुला स्मरणार --------३

उठता-बसता कामही करता
विरली काया सकलांकरिता
कवितारूपी सदा तुझे मी
नाम मुखी धरणार
माऊली सदा तुला स्मरणार ----------४

तुझ्याचरुपे विठूहरी तो
रोजच मजला दर्शन देतो
आठवरुपी मजजवळी तू
सदाचीच उरणार
माऊली सदा तुला स्मरणार ----------५

तव आयुष्या झाले सोने
बैसविले तुज जवळी प्रभूने
काव्यदीपा देऊनि मज सुख
दिधले अपरंपार
माऊली सदा तुला स्मरणार ----------६

स्थलकालाचे बंधन नुरले
अखिल विश्व हे तुझे जाहले
स्वप्नी परी मी कधीमधी तरी
अंकी तुझ्या निजणार
माऊली सदा तुला स्मरणार --------७

Hits: 160
X

Right Click

No right click