कांदा बटाटा

Parent Category: मराठी पुस्तके Category: सय कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

भाजीत भाजी पहिला मान
कांदाबटाट्याने सजले पान . . . १

जिवलग खरे पण स्वभाव वाकडा
जहाल नि मवाळ छत्तिसाचा आकडा . . . २

कांदा सारखा चिडायचा
रागराग फार करायचा . . . ३

रागाने लालबुंद व्हायचा
सा-यांच्या डोळा पाणी आणायचा . . . ४

बटाटा समजूत काढायचा
कध्धी नाही रागवायचा . . . ५

सा-यांना मदत करायचा
मिळून मिसळून वागायचा . . . ६

सारे कांद्याला हसू लागले
चिडका बिब्बा म्हणू लागले . . . ७

कांदा पटकन्‌ रुसला
कोप-यात जाऊन बसला . . . ८

मुळूमुळू रडू लागला
पळत पळत बटाटा आला . . . ९

कांद्याला म्हणे हळू बटाटा
तू तर मोठा धीराचा बेटा . . . १०

सा-यांशी गोड गोड बोलावे
कुणा कधी ना रागवावे . . . ११

तेंव्हापासून कांदा गोड बोलू लागला
लाल रंग सोडून पांढरा झाला . . . १२

दोघांची छान गट्टी जमली
कांदा बटाट्याने रंगत आणली . . . १३

Hits: 129
X

Right Click

No right click