बावन्नकशी सुबोध रत्नाकर - १

Parent Category: मराठी पुस्तके Category: सावित्रीबाई फुले - समग्र वाङ्मय Written by सौ. शुभांगी रानडे

सावित्री जोतीबा विरचित बावन्नकशी सुबोध रत्नाकर
इ १८९१ सावित्रीबाई फुले समग्रवाङ्मय

सावित्री जोतीबा विरचित अथ बावन्नकशी सुबोध रत्नाकर ।प्रारंभ।।

॥। उपोद्घात ।॥
जयाचे मुळे मी कविता रचिते॥
जयाचे कृपे ब्रह्म आनंद चित्ते॥
जयाने दिली बुद्धिही सावित्रीला॥
प्रणामा करी मी यती जोतिबाला ॥१॥

रची काव्य सोपे भुजंगप्रयाते
मनी वृत्त आखून गाणे लिहीते
भ्रतारास अर्पी बहू आदराने
नसे ते इहीहो परी चिंतनाने ॥२॥

करी शूद्रसेवा दिले धैर्य त्यांना
क्रियाशील नेता अशा जोतिबाचा
नसे जात ज्याला तसे पंथ काही
तया वंदुनी सावित्री काव्य वाही ॥३॥

वदे सर्व शूद्रांस सावित्री भावे
सदोदीत हे काव्य आन्हीक व्हावे
कुळाची कथा गीत ग्रंथी लिही मी
गुलामी जनाचा इतिहास नामी ॥४॥

॥। सिद्धता ।॥।

इतिहास शोधी मनी इंडियाचा
अधर्मी इराणी जयी जंगलीचा
तार्तरी रानटी लोक होते
जिताच्या सधर्मी घुसुनी रहाते ॥५॥

टिळा.लावला आर्य जेते म्हणूनी
म्हणे उच्च आम्ही कडू शूद्र योनी
गुलामी रूढी लादुनी धर्म सांगे
पशुतल्या जीणे स्रिया शूद्र भोगे ॥६॥

मनुष्यत्व सारे हिरावून भक्षी
तयाला असे वेद ही सर्वसाक्षी
अहंकारी भूदेव मगूर झाले
तयी वेळेला बुद्ध जन्मास आले ।७॥

अती भांडणे ब्रह्मे बुद्धात झाली
जयाची ध्वजा बह्म लोका मिळाली |
समाजात कल्पीत चौवर्ण बांधी
अमर्याद जाती तसे पंथ साधी ॥८॥

स्वधर्मी अती भिन्नता वर्ण जाती |
तिथे स्थीरता ना वसे ऐक्य नीती
फिरे शिष्यिणी शंकरावार्य मेळा |
पुकारे रुढी मूर्ख आचार पाळा ॥२॥

स्वत: भोगती सौख्य नाना अपार
कशी पुण्य बुद्धी तया लाभणर
मनी पाप सारे मनी भोग इच्छा
तशी स्वर्ग इच्छा धरी मोक्ष वांछा ॥१०॥

जना गांजती तर्कही ज्ञान सारे
मना भ्रष्टवी जीर्ण पोथी पिडा रे
असे सोंग हे ढोंग त्रीविप्र मंत्री
पुजा नाम संध्या जपे माळ तंत्री ॥११॥

अविचार अज्ञान मूर्खत्व जेथे
कसे काय राहील धर्मत्व तेथे
गुलामी कवाडी स्वधर्मीस कोंडी
करी व्यर्थ धर्मांध आक्रोश तोंडी ॥१२॥

मनू वर्ण कल्पी विषारी विकारी
अनाचार रूढी सदा बोचणारी
स्रिया शूद्र सारे गुलामी गुहेत
पशूसारखे राहती ते कुपात ॥१३॥

पुढे मुस्लमानी खिस्ती रोज झाले
तयांनी कितींनी स्वधर्मी बाटविले.
तिथे भाटगीरी हिंदू या मिषाने
करीती स्वये चाकरी लीनतेने ॥१४॥

अधर्मी पराज्यी तिथे राज मंत्री
अती शूद्र झाले स्वधर्मी कुपात्री
स्वधर्मी अती यातना शूद्र भोगी
असे पशूतुल्य जीणे अभागी ॥१५॥

म्हणोनी शिवाजी स्वराज्या उभारी
समाजी अतीशूद्र लोकास तारी
मनुष्यात आणि सुखी ठेवी त्यांना
परी शिवसत्ता पुढे लाभली ना ॥१६॥

Hits: 202
X

Right Click

No right click