मराठी भाषा आणि साहित्य यांची जपणूक, विकास व प्रसारासाठी ज्या संस्था सातत्याने कार्यरत आहेत, त्यापैकी सर्वात आद्य संस्था म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद ! पुण्यात २६ आणि २७ मे १९०६ रोजी झालेले चौथे संमेलन कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नागनाथ पाराजवळच्या मळेकर वाड्यात भरलेले होते. लोकमान्य टिळक, न. चिं. केळकर,चिंतामणराव वैद्य, विसुभाऊ राजवाडे, पांगारकर, रे. टिळक या संमेलनात सहभागी झाले होते. २७ मे रोजी समारोपाच्या दिवशी " महाराष्ट्र साहित्य परिषद आज रोजी स्थापन झालीआहे ", अशी घोषणा केली गेली.
पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतात. नागरी, ग्रामीण आणि आदिवासी भागात मिळून संस्थेच्या ७० शाखा आहेत. मराठी भाषा, साहित्य यांच्या अध्ययनाच्या प्रसारासाठी विविध स्तरांवरील परीक्षांचे आयोजन परिषदेतर्फे केले जाते. या सर्व उपक्रमांबरोबर परिषदेने साहित्यिक साह्यनिधी उभा केला आहे. अपंग, वृद्ध, निराधार अशा साहित्यिकांना या निधीतून दरमहा मानधन देण्यात येते.
वाड्मयीन कार्यक्रमांचे आयोजन- व्याख्यानमाला, चर्चा, परिसंवाद, कविसंमेलन, मुलाखती, मेळावे अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. (कै) वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयात ५०,००० जुने नवे ग्रंथ, दुर्मिळ नियतकालिके, सर्वप्रकारचे कोश, संदर्भग्रंथ आहेत. परिषदेच्या वतीने अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन आणि सर्व वाडमय प्रकारातील पुस्तकांना पारितोषिके देऊन गौरविण्याचे काम करण्यात येते.
१९६१ मध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांच्या पुढाकाराने मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली. मराठी भाषेसंबंधी असलेल्या आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या समान प्रश्नांवर विचार करणे, त्यावरचर्चा घडवून आणणे, एकाच व्यासपीठावरून त्या प्रश्नांची सोडवणूक करणे, त्यासाठी, समाजाच्या आणि शासनाच्या पातळीवर प्रयत्न करणे हे साहित्य महामंडळाच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट होते. त्यातही भाषेच्या प्रश्नाला अग्रक्रम देण्यात आला होता.
महामंडळाच्या स्थापनेच्यावेळी महामंडळाने अखिल भारतीय मराठी भाषकांची संमेलने भरविण्याचे काम हाती घ्यावेअसेआपल्या घटनेत नमूद केले. त्यानुसार १९६५ च्या सुरुवातीला संमेलनाची योजना पूर्ण करून ते काम महामंडळाने आपल्या हातीघेतले. त्यापूर्वी १९६४ पर्यंतची ४५ साहित्य संमेलने भरविण्याचे महत्त्वाचे काम महाराष्ट्र साहित्य परिषदेने केले.
उपक्रम
1. मसाप गप्पा
2. कथासुगंध
3. एक कवी- एक कवयित्री
4. लेखक तुमच्या भेटीला
5. संशोधनविभाग
6. लेखक कवींसाठी कार्यशाळा
7. म.सा.पत्रिका
8. साहित्य परिषदेच्या परिक्षा
9. मराठी शुद्धलेखन पुस्तिका
10. साहित्यिक साहाय्य निधी
11. सावित्रीबाई फुले अभ्यासिका
12. कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय
13. अतिथी निवास व्यवस्था
14. माधवराव पटवर्धन सभागृह
15. तळघरातील सभागृह
संपर्क-
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
४९६, टिळक रस्ता, पुणे ४११ ०३०
कार्यालयीन वेळ - सकाळी ९ ते १२ , सायंकाळी ४-३० ते ८
(०२०) -२४४७५९६३, २४४७५९६४
masapapune.org
masaparishad@gmail.com