अजंठा

Parent Category: महाराष्ट्र दर्शन
बुद्धकालीन चित्र व शिल्पकला किती कळसाला पोहोचली होती याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर अजंठा येथील लेण्यातून तो घेता येतो.
अजंठा-वेरूळ लेणी म्हणूनच जगप्रसिद्ध झालेली आहेत. परंतु आश्चर्य असे की, जगविख्यात झालेल्या अजंठा येथील गुंफा गेल्या शतकात योगायोगानेच प्रकाशात आल्या. एरवी त्या शेकडो वर्षे अज्ञातवासातच होत्या आणि पुढेही त्या अंधारातच राहिल्या असत्या.
इ. स. १८१९ मध्ये एक ब्रिटीश क्रॅप्टन जॉन स्मिथ या परिसरातील गर्द जंगलात शिकार खेळण्यासाठी आला असताना जंगलाने व्यापलेल्या या गुंफा अचानक त्याच्या नजरेस आल्या आणि त्यानंतर मात्र तेथील रान मोकळं करून या गुंफाचा शोध घेण्यात आला.
सह्याद्री पर्वताच्या सातमाळा डोंगर रांगेतील नालेचा आकार असलेल्या एका डोंगर उतारावर या गुंफा खोदण्यात आल्या आहेत. या ठिकाणी एकूण ३० लेणी असून ती इ. स. पूर्व दुसऱ्या शतकापासून इ. स. नंतरचे पाचवे शतक अशा सुमारे ८०० वर्षांच्या काळात खोदण्यात आली आहेत. या लेण्यांमध्ये मुख्यत: चैत्य, प्रार्थना मंदिरं, सभागार, विहार आणि मठांची व्यवस्था आहे. या ठिकाणी धार्मिक स्वरूपाची नित्यकर्मे व कर्मकांड पार पाडली जात असावीत.
ज्या डोंगरात ही लेणी खोदण्यात आली आहेत. त्यांच्या माथ्यावर एक जलौघ असून त्याचे पाणी एका नैसर्गिक कुंडात साठवले जाते.
     या कुंडास सप्तकुंड असे म्हणतात. क्र. ९ व १० च्या लेण्यात चैत्यगृहे आहेत. ८, १२, १३ व १५ क्रमाकांच्या लेण्यांचाही मठ किंवा प्रवचने यासारख्या धार्मिक कर्मासाठी उपयोग होत असावा. लेणी क्र. १, २, १६, १७, १९ व २६ या सुद्धा अशाच कार्यासाठी तयार करण्यात आली असावीत. या सर्व लेण्यांमध्ये बुद्ध आणि बुद्ध जीवन शिल्प व चित्रकलेद्वारे चितारण्यात आले आहे. लेण्यांमध्ये चितारण्यात आलेली रंगीत चित्रे तर अतिशय अप्रतिम आहेत. शेकडो वर्षे उलटूनही त्यातील रंग मात्र अजूनही उबदार आहेत. बुद्धावतार, जातककथा असे बुद्धजीवनाशी निगडित प्रसंग येथे कलात्मकतेने चित्रित केलेले आहेत. बोधीसत्व पद्मपाणी, आकाशगामी अप्सरा, बुद्धाचे सहस्त्रावतार, नृत्यगायन करणाऱ्या अप्सरा, पत्नीकडे भिक्षेची याचना करणारा बुद्ध, राजसभा आदि चित्रे खरोखरीज अद्वितीय आहेत. गुंफांमध्ये चितारलेली रंगीत चित्रे आणि शिल्पचित्रे भव्य तर आहेतच पण त्यातील भाव, नाट्य, बांधेसूदपणा, लय आणि गति यामुळे सर्व कलाकृतींना कमालीचा जिवंतपणा आलेला आहे.
X

Right Click

No right click