Designed & developed byDnyandeep Infotech

रक्षाबंधन - २

Parent Category: मराठी साहित्य

वीस वर्षापूर्वी मनोहर आणि महंमद होते फक्त सहा वर्षाचे आणि मधुरा होती नऊवर्षाची. मिरजेसारख्या शहरात मनोहरचे वडील वसंतराव देशपांडे पोस्टमास्तर म्हणून बदलून आले. त्यांना पोष्टाच्या इमारतीतच रहायची सोय होती. सौ. देशपांडे सुगृहिंणी म्हणून चांगला संसार करीत होत्या. त्यांच्या शेजारीच महंमदच्या वडिलांचे म्हणजे फाजलचे सायकल दुरूस्तीचे दुकान होते. अशिक्षित बायको, अपुरी मिळकत आणि तीन मुलांचा संसार करताना त्याचा जीव मेटाकुटीस येत असे. मनोहर आणि महंमद समवयस्क असल्याने या दोन मुलांची गट्टी जमली. मधुराही त्यांच्या खेळात सहभागी होई आणि त्याना मार्गदर्शन करी. ती मोठी असल्याने व त्यांना योग्य रितीने समजून सांगत असल्याने, ती सांगेल ते सर्व ते दोघे ऐकत असत. सणासुदीला मनोहर महंमदला आपल्या घरी जेवायास बोलावे. आपल्या मुलाला चांगल्या सवयी लागतील, मनोहर बरोबर तो अभ्यास करील, म्हणून फाजलही महंमदला कोणतीही आडकाठी न घालता मनोहरच्या घरी पाठवी. रक्षाबंधनाच्या दिवशी मधुरा मनोहर बरोबर महमदलाही राखी बांधत असे. महमदही अभिमानाने ती राखी सर्वांना दाखवून मला ताईने राखी बांधली असे सांगत असे. त्यानंतर सहा वर्षाचा कालावधी संपला आणि देशपांडेची बदली पुण्याला झाली. मनोहर आणि ताईची ताटातूट होणार म्हणून महंमद बेचैन होता. महंमद ताईला म्हणाला, यताई, आता पुन्हा तू मला राखी केव्हां बांधणार ? मी मोठा झालो म्हणजे तुझ्याकडे येईन आणि तुला अशी भेटवस्तू देईन की जन्मभर ती तुझ्या लक्षात राहील.' मधुरानेही त्याला समजावून सांगितले की, पुणे कांही फार दूर नाही. रक्षाबंधनाचे दिवशी तू माझ्याकडे नक्की ये. मी तुझी वाट पाहीन.'
पुण्याला गेल्यानंतर मनोहर आणि मधुरा आपली शाळा, अभ्यास आणि इतर कार्यक्रमात रमून गेले. त्यानंतर तीन वर्षानी त्यांची बदली ठाण्याला झाली. ठाण्याला ते बरीच वर्षे होते. मधुरा बी.ए. एम.ए. झाली आणि तिला एका शाळेत नोकरी मिळाली. तिचा विवाहही झाला. मनोहर चांगले गुण मिळवून त्याने अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याला स्थापत्य शास्त्र विभाग मिळाला. सर्व्हेइंग या विषयात त्याना रस्ता योजना, पाणी योजना वगैरे प्रॉजेक्ट असल्याने त्यांचे प्राध्यापक त्याना जवळच्याच आदिवासी विभागात घेऊन जात, आदिवासी विभागातील शाळेतील एक शिक्षक नेहमी या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या संपर्कात होते व या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आदिवासी शाळेतील मुलाना मिळावे म्हणून प्रयत्न करीत होते. या आदिवासी विभागातील मुलाना आपला इतिहास, रामायण, महाभारत शिवाय आरोग्य, स्वच्छता या संबंधीची माहिती सांगण्यासाठी सुटीच्या दिवशी ते अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बोलावीत. या कामात मनोहर आघाडीवर असे. त्याचे शिक्षण पुरे झाल्यावर त्याने त्याच आदिवासी भागात अभियंता म्हणून नोकरी धरली. डोंगरमाथ्यावर खड्डे खणून, उतारावर बांध घालून पाणी अडवण्याचे प्रयत्न झाले आणि त्यामुळे विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. मुरूमाचे रस्तेही करायला सुरूवात झाली. पण दोन वर्षातच त्याची बदली शहरात केली. आदिवासी विभागातील काम अर्धवट टाकून जाण्याची त्याची इच्छा नव्हती. म्हणून त्याने राजीनामा दिला आणि तेथील सार्वजनिक कामाला वाहून घेतले. त्याच्या कामाचे फळ त्याला दिसू लागले. जवळ जवळ १५-२० खेडयातील लोकांना विहिरीचे पाणी वर्षभर मिळू लागले. शेतीत सुधारणा झाली. लोकंाची मिळकत वाढली, मुलांचे शिक्षण चांगले होऊ लागले. आरोग्याची काळजी डॉक्टर व नर्सेसच्या सहाय्याने होऊ लागली. त्या भागात त्याच्या शब्दाला मान होता. देव माणूस म्हणूनही लोक त्याचा आदर करीत.

X

Right Click

No right click